वेळ संध्याकाळच्या चारची. भाद्रपदी उन्हाने तापलेला दिवस. वातावरणात प्रचंड उष्णता आणि कमालीचा दमटपणा. बसल्याजागी माणसाला घाम फुटेल अशी अवस्था. शिरूरच्या इंदिरा गांधी पुतळ्याजवळ लागणाऱ्या टमटममध्ये मंदिरात वाकून जावं तसा आत गेलो. कसा बसा अंग चोरून बसलो. काळ्या रंगाचा एसी मॅजिक दैठणला जाण्याची वाट पाहत उभा होता. या नव्या गाड्यांना देखील इकडे टमटमच म्हणतात . आतमध्ये एक म्हातारा आणि म्हातारी बसली होती. म्हातारीच्या हाताला असलेली सलाईनची चिकटपट्टी स्पष्ट सांगत होती की ते वृद्ध दाम्पत्य दवाखान्यातून घरी चाललेलं आहे. "कधी भरायचं कायनू हे टमटम?" म्हातारी कुजबुजली. "आग त्यांचं पण पोट हे, भरल्याशिवाय कसकाय निघेल गाडी" म्हाताऱ्याने तिची समजूत घातली. धोतराचा घोळ सावरून पुन्हा व्यवस्थित बसला. त्यांचा साज अजूनही नवीन जोडप्यासारखाच होता. जोपर्यंत गाडीतून माणसं बाहेर पडल्यासारखी दिसत नाहीत इतकी गाडी गच्च भरायची आणि मगच दैठणच्या रस्त्याला लागायचं असा या ड्रायवर लोकांचा नियम. माणसांना शिरूर ते दैठण हा प्रवास थ्रिल वाटावा इतकं भयंकर अ...
मराठी मातीच्या वैभवासाठी , मानवी मनाच्या भरणपोषणासाठी , संवेदनांची आणि पर्यायाने सृजनाची हळुवार पेरणी करण्यासाठी 'इर्जिक'!... शेतीमातीच्या भावभावना , ज्वारी बाजरीच्या ताटाची ऐट , घुंगरमाळांचा आवाज , नांगराच्या चाकाची किरकिरगितं , गावरान मधाळ बोली , प्राणी पाखरांच्या सुखावणाऱ्या हालचाली सारं काही जपण्यासाठी 'इर्जिक'!....शेतातली भलरी , श्रावणाच्या सरी , लग्नाचे मांडव , लाजरी बुजरी नवरी , वारी आणि वारकरी , मृदंगाचे निनाद , काकडारतीचे रम्य सूर हे सारं काही जपून ठेवण्यासाठीची 'इर्जिक'! ....