Skip to main content

टमटम


वेळ संध्याकाळच्या चारची. भाद्रपदी उन्हाने तापलेला दिवस. वातावरणात प्रचंड उष्णता आणि कमालीचा दमटपणा. बसल्याजागी माणसाला घाम फुटेल अशी अवस्था. शिरूरच्या इंदिरा गांधी पुतळ्याजवळ लागणाऱ्या टमटममध्ये मंदिरात वाकून जावं तसा आत गेलो. कसा बसा अंग चोरून बसलो. काळ्या रंगाचा एसी मॅजिक दैठणला जाण्याची वाट पाहत उभा होता.  या नव्या गाड्यांना देखील इकडे टमटमच म्हणतात . 


आतमध्ये एक म्हातारा आणि म्हातारी बसली होती. म्हातारीच्या हाताला असलेली सलाईनची चिकटपट्टी स्पष्ट सांगत होती की ते वृद्ध दाम्पत्य दवाखान्यातून घरी चाललेलं आहे. 
"कधी भरायचं कायनू हे टमटम?" म्हातारी कुजबुजली. 
"आग त्यांचं पण पोट हे, भरल्याशिवाय कसकाय निघेल गाडी" म्हाताऱ्याने तिची समजूत घातली. धोतराचा घोळ सावरून पुन्हा व्यवस्थित बसला. त्यांचा साज अजूनही नवीन जोडप्यासारखाच होता. 

जोपर्यंत गाडीतून माणसं बाहेर पडल्यासारखी दिसत नाहीत इतकी गाडी गच्च भरायची आणि मगच दैठणच्या रस्त्याला लागायचं असा या ड्रायवर लोकांचा नियम. माणसांना शिरूर ते दैठण हा प्रवास थ्रिल वाटावा इतकं भयंकर असतं हे प्रकरण ! असो त्यानंतर एक बाई बाजार घेऊन आली. 
  "कधी भरायचं कायनू हे टमटम?"  असं म्हणत  बाजाराची पिशवी मांडीवर घेऊन बसली. 
पुन्हा एक म्हातारी हाताला चिकटपट्टी लावून आली . 'कधी हालायचं कायनू हे टमटम' असं म्हणत बसली. 
मग काय दोन म्हाताऱ्यांच्या गप्पा सुरु झाल्या. 
 "तूम्हाला काय झालंय ओ, हाताला कागोद लावल्याला दिसतोय "
"पेशा वाढल्या व्हत्या; आठ दिस झाले हॉस्पिटलमधी येढे घालिते"
"काय बया रोग बसला त्या पेशांच्याव ! मुडदा बशिवला त्या पेशांचा!! ज्याला बघावं त्याला पेशानी धरलंय" टमटममधी बसून वैतागलेली म्हातारी चांगलीच तापली.
"हा ना बया ,काही बी रोग निघाल्यात. पूर्वी नव्हतं असलं काही." नवीन म्हातारीने दुजोरा दिला.
"हे सगळं हायब्रेट खान्यानी व्हतंय" म्हाताऱ्याने मधेच त्या दोघींच्या बोलण्यात सहभाग घेतला आणि मग त्यांनी बऱ्याच वेळा चर्चा केली. 
तोपर्यंत ड्रायवर ने उगाचच वडापाव च्या टापरित डोकं घाल, कुठं माव्याच्या गाडीवर चर्चा कर, कुठं उगाच फोनवर स्टाईलमधी बोल असा टाईमपास केला. 
टमटम मध्ये जवळजवळ 15 जण जमले होते. काही जण आत गरम होतं म्हणून बाहेर उभे राहिले होते.  सगळे दिवसभर रापलेले, घामेलजलेले, थकलेले. त्यानंतर एक पाच सहा वर्षाची पोरगी असलेली गावातली बाई   येऊन बसली. आता टमटम मध्ये फुल गर्दी झाली होती. ती आणि तिची बारकी पोरगी बळंबळं चेपून बसले. आता उपस्थित सर्वांच्याच बुडाला चांगला दाब पडला होता . सिटांच्या दोन रंगांच्या मध्ये ती 5 वर्षाची पोरगी उभी राहिली होती. जात्याचा खुट्टा नारळाची शेंडी घालून ठोकावा तशी ती पोरगी उभी राहिली. एवढ्या गर्दीत तिनी कुरकुऱ्याच्या पुडा काढला आणि जर्शी वासरा सारखी कराकरा खायला चालु केलं. हायजिन बिजिन ह्या सगळ्या बोलायच्या गोष्टी हेत इकडं गावाकडं !
दोन तीन भैय्या लोक आले आणि मागच्या हाऊद्यात बसले आणि मग ड्रायव्हर साहेब आले. गाडीला टाटर  मारला आणि गाडी शिरूरहून निघाली. अख्ख्या टमटमवर भैय्यांनी अनंत उपकार केल्याची एक लकेर सर्वांच्या चेहऱ्यावर उमटली!

त्या म्हातारीची नथ थेट ओठांवर टेकली होती. गालावर भरपूर सुरकुत्या आणि त्यात हरवलेली तरीही उठून दिसणारी खळी होती!! नाकातल्या नथीला नाजूक हिसडा देत बोलण्याची तिची कला आजच्या तरण्या पोरींना बी जमणार नाही अशी ! अंगात अजूनही तीच तारुण्याची तरतरी ! एवढ्यात गाडी शिरूर सोडायच्या बेतात होती आणि म्हातारीची चुळबुळ चालू झाली. 
"कुढ गेल्या कायनू माह्या वहाणा? इथंच व्हत्या. " असं म्हणत म्हातारी चपला शोधू लागली. थोड्या वेळासाठी टमटमच्या मधल्या भागातील लोकांमध्ये चांगली हालचाल झाली. 
" आवो आजी ,  थांबा जरा उतरायच्या टायमाला  बघू आपण चप्पल . हि काय यष्टी हे का .थांबत्यात डायवर "  अशी समजूत काढण्याचा  सगळ्यांनी प्रयत्न केला पण म्हातारीचा जीव नुसता खाली वर खाली वर !!
तिची हि चुळबुळ न पाहवून म्हाताऱ्याने देखील चप्पल शोधायला सुरुवात केली . पण इथे बोट घालायला जागा नाही एवढी गर्दी आणि त्यात चपला कशा सापडणार ? तरी बी म्हातार्याने खाली हात घालून एक चप्पल वर काढली . 
" बघ बाई म्हातारं ...लैच काळजी बाई म्हातारीची" असे उदगार एका बाईने काढल्यावर टमटममध्ये  थोडा वेळ लज्जामिश्रित हास्य दाटून आले .

 एक चप्पल हातात आली तरी म्हातारी  मात्र अस्वस्थच होती. एव्हाना घोडनदीच्या भल्या उंच पुलावर गाडी आली आणि  घोडनदीच्या पाण्याचा  ओला वास आला . जरा वेळ सगळ्यांनी डोळे भरून पाणी पहिले . पुन्हा म्हातारा आणि म्हातारीने चप्पल शोधण्यात जरा वेळ घातला . अशा वेळी मात्र ती बारकी चिमुरडी निवांत कुर्कुर्या खात बसली होती . तिला घडणाऱ्या घटनेचे कसलेही अप्रूप नव्हते . 

आता त्या दुसर्या म्हातारीने त्या पोरीला विचारले " बाइ कितवीला हे गं तू ?"
कुर्कुऱ्याचं दांडकं तोंडात घालत पोरगी उत्तरली " चौथी" 
यानंतर मात्र तिच्या आईनी बाजू लावून धरली . 
"हा हाये चौथीलाच पन नुसतं त्वांड चालू असतंय दिवसभर . नुसता चरतच रहाती दिवसभर . त्याच्यामुळंच झालाय टोंशील ईला "
"ईला आन टोंशील !! ?"" असे आश्चर्याचे उगदार माझ्या शेजारच्या बाईने उच्चारले. बऱ्याच वेळानंतर या बाईंनी काहीतरी बोलायला सुरुवात केली . 
"काय बया रोग निघालेत एक एक , आता एव्हांल्या पोरांना कह्याला पाहें टोंशेल " यानंतर मात्र टमटममध्ये त्यांची बरीच चर्चा झाली . म्हातारी  एकदाची चप्पल शोधून दमली आणि शांत बसली होती.  गव्हाणवाडीवर माशांच्या येणाऱ्या वासामुळे तिनी नाकाला लावलेला नऊवारी पदर हिंगणी फाटा गेला तरी काढला नव्हता . 
पुढं सोनलकराच्या पेट्रोल पम्पापर्यंत गाडी गेल्यावर म्हाताऱ्यानी वीस रुपयाची नोट खिशातून काढली आणि म्हातारीच्या हातात ठेवली . ती नोट म्हातारीच्या हातात पडली आणि लगीच तिचे पीळकुटीत रूपांतर झाले . बायांना नोटेची पिळकुटी करायची फार सवय असते का काय माहीत ! त्यात हाताला आलेला घाम यामुळे नव्या नोटेचा पार अवतार होऊन जातो . असो, डायव्हरला हाक मारून म्हातारा मधेच उतरणार होता . त्याला फाट्यावरच्या दुकानातून कांदे झाकण्यासाठी कागद घ्यायचा होता , उतरल्या उतरल्या म्हाताऱ्याने म्हातारीच्या सीटखाली लांबवर हात घातला आणि म्हातारीचं दुसरी चप्पल काढली . काहीही न बोलता थाटात ती चप्पल तिच्या हातात दिली आणि गाडी पुढे हलली . 
माझ्या शेजारी बसलेल्या बाईच्या तोंडातून हळूच उदगार बाहेर पडले . 
"बघा म्हातारं , किती काळजी हे म्हातारीची ... बाई !!" 
  " लवकर या वो, लै येत नका बसू " म्हातारी ने म्हाताऱ्याला  सुनावले . 

त्यांचं हे प्रेम बघून टमटम जरा कावरी बावरी झाली . 
पण असू शकतं ना आयुष्याच्या शेवटपर्यंत तसंच असाच प्रेम नव्या कोऱ्या शालूसारखं ...घडी उलगडली कि दरवाळणाऱ्या सुगंधासारखं... अंगणात उभं राहील कि येणाऱ्या मोगरी वाऱ्यासारखं... कानोसा घेतला कि ऐकू येणाऱ्या घुंगरासारखं ... असू शकत ना प्रेम नव्या कोऱ्या शालूसारखं ... देवपूजेनंतर नटलेल्या देवघरासारखं... गंध लावल्यावनंतर चिकटवला अक्षदांसारखं... पाणी सुटल्यानंतर उरलेल्या गारव्यासारखं... असू शकत ना प्रेम नव्या कोऱ्या शालूसारखं .... 
म्हातारा खाली उतरला त्यांनतर मात्र म्हातारीने दोनदा त्याच्याकडे मागे वळून पाहण्याचा अयशस्वी
  
प्रयन्त केला . यानंतर अगदी लगेच दोन भैय्या उतरले , ड्रॉयव्हरच्या शेजारी एक भैय्या अजून बाकी होता . 

बेलवंडी फाट्यावर म्हातारी उतरली . नथीला नाजूक हिसडा दिला . पदर सावरला . हातात पिशवी नीट अडकवली  आणि २० रुपयाची पिळकुटी ड्रायव्हरच्या  हातात देऊन बाजूला जाऊन उभी राहिली . म्हाताऱ्याची वाट पाहत . अगदी नेहमीसारखी.... 


फाट्याच्या १० पावलं पुढं नाय ढळली गाडी कि भैय्यानी थांबवली ना गाडी . च्यायला सगळे बघायला लागले का गाडी थांबली . तोपर्यंन्त भैय्या पुढचा दरवाजा उघडून उतराला आणि एका टायर पंक्चरच्या दुकानात शिरला . कोणालाच काही कळेना , ड्रायवर सुद्धा जरा वेळ बघतच राहिला . पण दोनच मिनिटात भैय्या बाहेर आला आणि पुन्हा गाडीत बसला . हातात घेऊन आला होता एक चार्जर . तेव्हा मला कळलं कि बाबा एवढ्या सगळ्या लोकांच्या वेळेपेक्षा भैय्याचा चार्जर महत्वाचा होता . शेवटी दिड जीबी संपवायचा असेल त्याला . आता माणसांना दीड जीबी संपवणे हे एक नवे कामच जणू मिळाले आहे . 
मी पुन्हा मागे वळून पाहिले , भर पावसाळ्ययात रस्त्यावरून फुफाटा उधळत होता , टमटम जोरात निघाली होती. फळवाले , गॅरेजवाले, हॉटेलवाले सगळे व्यस्त होते , ज्याच्या त्याच्या धुंदीत बेलवंडी फाटा वाहत होता . म्हातारी खाली बसली होती पिशवीजवळ ...म्हाताऱ्याची वाट पाहत ... असू शकतं ना प्रेम आयुष्याच्या शेवटापर्यंत टमटम गेली कि रस्त्यावर उडणाऱ्या फुफाट्यासारखं .... 

- अजिंक्य 

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...