Skip to main content

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे

आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले .


पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्यांपासून देखील शिंकाळे विणले जाते .

फोटो : राहुल ठाणगे


खरं सांगायचं झालं तर शिंकाळं हे जरा सधन कुटुंबाची निशाणी आहे . साधन यासाठी कि शिंकाळं टांगायला तेवढं उंच छत असावं .त्यात ठेवण्यासाठी दूध असावं .  कृष्णलीलांमध्ये दहीहंडीचे उल्लेख आढळतात . गोपींना चुकवून गवळ्याच्या घरी मित्रांसमवेत  जाऊन चोरून दूध दही लोणी खाण्यासाठी भगवंताने केलेले हे उपद्व्याप अनेकांच्या लक्षात आहेतच .पण मडके लटकावून ठेवले तरी मांजर त्यावर झडप घालते , पाल जाण्याची शक्यता असते म्हणून शिंकाळं बेस्ट . 

वैयक्तिक मला दूध दही असले पदार्थ आवडत नाहीत . कदाचित अनेक लोक या पदार्थांसाठी इतके आसुसलेले असतात कि मला त्यांच्यावर कीव येते. अक्षरशः भांडणं होतात . दुधाची साय खाण्यासाठी अनेक चढाओढ अनेकांच्या लक्षात असेल . असो तर शिंकाळ्यावर अशा दुग्धजन्यपदार्थप्रेमींचा डोळा असतो . शिंकाळ्याविषयी माझी आठवण माझ्या आजोळातील आहे . आमच्या आजीचा मोठा कौलारू वाडा आहे . तिथे एका आडव्या तुळईला ते शिंकाळे टांगलेले असायचे . ते एका काठीने आम्ही खाली काढायचो . ते आल्हाद ते खाली घेताना त्यातले पार्थ सांडू नयेत याची काळजी घ्यावी लागायची . आता शिंकाळे शोभेची वस्तू म्हणून कुठे कुठे आढळते .

एकदा मी आजोळाला गेलो . बहुतेक मोठा वाडा आहे . तिथे लपाछपी खेळताना मी एकदा लपायला जात असताना माझ्या डोक्याला काहीतरी लागले . अंगावर काहीतरी सांडले . खेळताना काही कळले नाही पण नंतर संध्याकाळी दूध सांडल्याचा बोभाटा झाला . मग मला सगळे संदर्भ लागले आणि माझ्या अंगावर दूध सांडले होते . माझी टक्कर शिकाळ्याला झाली होती . तेव्हा मी पहिल्यांदा शिंकाळे पहिले . त्यानंतर माझ्याकडून दूध सांडले हे मी कोणाला सांगितले नाही पण माझ्या भामट्या झालेल्या चेहऱ्यावरून सगळ्यांना माझे प्रताप लक्षात आले होते . हे मला नंतर कळले .  

एकनाथांच्या एका अभंगात शिंक्याचा उल्लेख आढळतो . 
' शिंकेचि तोडितो 
मडकेची फोडितो 
करी दह्या दुधाचा रबडा 
असा कसा देवाचा देव बाई ठकडा ' असा तो अभंग . शिंके तोडून , मडके फोडून श्रीकृष्ण दह्या दुधाचा रबडा करतो .चोरी करून ते खातो . यातून सवंगडी धष्टपुष्ट व्हावेत आणि त्यांच्या हातून राष्ट्रउत्थानाचे काम व्हावे हीच कृष्णाची अपेक्षा . फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळे गेले . हरवले . असो ' change is constant  ' या न्यायानुसार बदल होत राहणार . ते स्वीकारण्यात शहाणपण असते !

- अजिंक्य 
(  माझे स्नेही संतोष शिंदे यांची हि फर्माईश होती कि मी शिंकाळ्यावर लिहावे . त्यांचे विशेष आभार . )







Comments

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...