गावाकडे जाऊन आलो की मन तिकडे अडकून बसतं . तिकडच्या जगण्यातला साधेपणा खूप जास्त सुंदर आहे . इकडे शहरात भरून राहिलेला यांत्रिकपणा , नात्यागोत्यांचा गुंता , आधुनिकतेच्या नावाखाली सुरू असलेले ढोंग आणि आपल्या आयुष्याची सुरू असलेली मार्केटिंग मला असह्य होते . माझे प्रश्न साधे असतात . संध्याकाळी अंथरुणावर पाठ टेकली की प्रश्नांचं मोहळ उठतं . आईनंतर मला चुलीवरची भाकरी पुन्हा मिळेल का ? गावाकडची ती चूल टिकेल का ? गोठ्यात वासरू ओरडेल का ? घरासमोर पक्षी येतील का ? रांगडा बाज असलेली भोळी भाबडी जुनी माणसं पुन्हा तो रुपायएव्हढा बुक्का लावून काठी टेकवत येतील का ?
हे प्रश्न हल्ली मला जगू देत नाहीत . बदलाच्या या कचाट्यात माझ्या मेंदूचे तुकडे व्हायला लागलेत . आयुष्यात काय साध्य करण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे ? हे सगळे थांबवले नाही तर याच्या शेवटाला थोड्याफार भावना उरतील का ? आयुष्य कोरडे होत चालले आहे ? समाज कोरडा पडत चाललाय . हे थांबेल का ?
गाय वासराला चाटेल का ? पेटलेली चूल ऊब देईल का ? भाकरीचा पातोडा निघेल का ? भाकरीचा पातोडा निघण्यासाठी माणसाच्या मनं मोकळी असावी लागतात . दूध काढून झाल्यानंतर गायीला नमस्कार केला जाईल का ? गाय हंबरेल का ? बैलांच्या डोळ्यांमध्ये प्रेम असेल का ? ही माणसं , हे गाई बैल , चूल गेल्यानंतर पुन्हा येतील का ?
कपाळभर कुंकू लावलेली म्हातारी काठी टेकवत येऊन जीवनभराच्या आधाराचे दोन शब्द देईल का ? त्या जुन्या माय बापड्यांचा भोळेपणा पुन्हा येईल का ? ही माणसं हरवत आहेत . मी कितीही सांत्वन केले तरी माझ्या मनाची समजूत निघत नाही . माझ्या जिव्हाळ्याच्या गोष्टी संपत आहेत . माझ्यातला मी कसा जिवंत ठेवायचा ?
हे बैल गेल्यानंतर माझ्या खांद्यावर एवढ्या विश्वासाने कोणी डोकं ठेवेल का ? माझं डोकं चाटून देणारा , मी गेल्यावर आनंदाने डोळे उघडून माझ्याकडे बघणारी ती गाय नसेल तर मी कसं जगायचं ?
बिनधास्त छाताडावर पाय ठेवून प्रेम करणारा आमचा कुत्रा नसेल तर ? मळलेल्या कापड्यांमधली स्वच्छ माणसं जोपर्यंत आहेत तोपर्यंत जगण्यात मजा आहे . पॉलिश केलेल्या जगात घुसडलेला यांत्रिकपणा काय कामाचा ? धोतराच्या सोग्यात गुंडाळलेल्या लेमन गोळ्या ज्याला मिळाल्या त्याला जगात कोणतेही सुख जिंकू शकत नाही . सुरकूतलेला हात डोक्यावरून फिरला असेल तर त्याला दानपेटीचा आशीर्वाद घेण्याची गरज नाही . गाई बैलांच्या खांद्यावर नाचला खेळला असाल तर जगात तुम्ही सर्वात श्रीमंत आहात . हे विसरू नका .

Comments
Post a Comment