हा शब्द गुगल केला तर शेतामधली वाट असा अर्थ मिळतो . या शब्दाचा अपभ्रंश होऊन , ग्रामीण लहेजा घेऊन हा शब्द पाणद, पाणंद, पाणंध, पाणंदी, पाणंधी अशा विविध रुपात नाचत आहे . शेतातून जाणारी वाट म्हणजे "पाणंद " . दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद म्हटलं जातं .हि पाणंद अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहे . हा शब्द मात्र अस्तंगत होतोय . असो . हा शेताचा बांध असल्यामुळे पानंदीच्या दुतर्फा घायपात लावले जाते . त्याच्या टोकदार काट्यांमुळे कुंपण मिळते आणि मालाचे संरक्षण होते .
पाणंद ही खूप जिव्हाळ्याची गोष्ट आहे . आजूबाजूला झाडाझुडपांचा गराडा , मोठ्या वृक्षांची सावली , मधेच आडवे येणारे छोटे ओढे , असंख्य पक्षी , साप , खारुताई , उंदीर , सरडे सर्वांचे एकत्रित अस्तित्व असणारी पाणंद सुंदर असते . मला हिवाळ्यात पाणंद विशेष आवडते कारण हिरव्यागार झाडीतून धुक्याच्या दुलईतून चालताना खोड्या कराव्यात तशी ती झाडे आपल्यावर दवबिंदू शिंपडत असतात . चुकूनजरी एखाद्या झाडाला धक्का लागला तरी सगळं पाणी अंगावर पडणार आणि थंडी वाजणार !खाली गवत देखील वाढलेलं असतं त्यामुळे चप्पल बूट हमखास ओले होतात . एकंदरीत इथे आल्यावर एकतर इथले व्हा नाहीतर इकडे येऊ नका असा इथला अलिखित नियम आहे . कपड्यांची काट्याकुट्यांची जखमांची पर्वा केली तर तुम्हाला हा ग्रामीण निसर्ग स्वीकारणारच नाही !
पाणंद रस्त्यांचे प्रश्न आपण नेहमी वर्तमानपत्रांमधून वाचत आलो आहोत . बांधावरून होणारी भांडणं , कमी होत चाललेल्या जमिनी यामुळे पाणंद रस्त्यांचा प्रश्न गंभीर होत आहे . शेतापर्यंत खते, चारा आणि आवश्यक गोष्टी नेता याव्यात यासाठी पाणंद रस्त्याची गरज असते . शेतातील माल कमी वेळेत बाजारठेत पोचला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होते .त्यामुळे पाणंद चांगली असावी . शक्यतो हे प्रश्न सामंजस्याने सोडवावेत .
मी माझ्या बाबांसोबत रात्री अनेकदा आमच्या वस्तीवर यायचो . मागे सांगितल्याप्रमाणे आम्ही गावापासून थोडे दूर राहतो . तर इकडे चिंचदऱ्यात रात्री बाबांच्या खांद्यावर बसून येणे यापेक्षा अजून मोठे सुख काय असू शकेल ? तर बाबांच्या खांद्यावरून अर्धा झोपेत असताना मी अनुभवलेली झाडांच्या पानांची सळसळ , रात्रीच्या वेळी बाहेर निघालेल्या सशांची धावपळ , अंधाराची भीती , ज्वारीचे मोत्यासारखे चमकणारे दाणे , वटवाघळे सगळं काही अविस्मरणीय ! फार कमी लोकांच्या नशिबात हे दिवस येतात . तर त्या पाणंदिने शाळेतून घरी येताना एकदा मला एक भली मोठी धामिन (एक साप )आडवी गेली आणि मी घाबरून गेलो . तेव्हापासून जवळजवळ वर्षभर मी इतका घाबरून गेलो होतो की त्या पाणंदिने एकटा जाऊच शकायचो नाही . जर एखादी गाडी किंवा कोणी माणूस आला तर त्याच्या मागेमागे जायचो . अशा वेळी मी घाबरतोय हे देखील मी कळू द्यायचो नाही आणि त्यांच्यापासून अगदी कमी अंतरावर चालायचो.
नंतर मला धीट व्हायला खूप वेळ लागला . आता ट्रॅक्टर जाण्यासाठी रस्ता म्हणून किंवा मोठा ट्रक जाण्यासाठी झाडे तोडली गेली आणि आता इथे खूप कमी झाडे शिल्लक आहेत . आमच्या मळ्यात पाणंद रस्त्याचे एवढे प्रश्न नाही निर्माण झाले . एकंदरीत शेतातली वाट म्हणजे पाणंद . विहिरीवर जाण्यासाठी आमची वाट पूर्वी इतकी भयानक होती की बास . अरे मिनी जंगलच होतं ते !
पावसाळ्यात पाणंदी नव्या नवरी सारख्या दिसतात . त्यांचं सौंदर्य साड्यांची महाराणी स्वामीनीसारखं दिसतं ! फुलांची मनोवेधक आरास , वेलींची नक्षी , झाडांच्या कमानी हे फक्त आमच्या गावाकडेच मिळेल !
आता शहरात जर एखाद्याला पत्ता विचारला तर तो सांगेल "सिधा जाने का , बाये मुड़ने का ओर उस नेट कैफे के बगल में जो बड़ी बिल्डिंग है ना उसके सातवे फ्लोर पे है " असं सांगू शकतो .यात कोरडेपणा आहे पण हाच पत्ता जर आमच्याकडे विचारला तर तो असा असेल . " तू इधून गेला ना की खाली एक जांभळीचं झाड लागन . त्या झाडाच्या पुढं पांदी पांदीनी गेला की वस्ती हाय बघ तुकारामाची .आन जर त्यो तीधं नसला तर हिरीच्या भवताली आसल"मग असा रस्ता न्याहाळत गेलो की त्या रानावनात अनेक प्राणी पक्षी भेटतात .ते जगण्याची ऊर्जा देत असतात . लढायला हिम्मत , हसण्यासाठी गम्मत , जगण्यात रंगत हे सगळं मिळतं . प्रामाणिकपणे शरण जाणे हेच महत्वाचे ...
- अजिंक्य
Comments
Post a Comment