तुडुंब भरलेले माऊली सभागृह , अत्तराचा सुगंध आणि जाणत्या प्रेक्षकांसमोर सादर होणारा राम गणेश गडकरींच्या एकच प्याला चा प्रयोग . ऐन दिवाळीच्या मंगलमय प्रभाती हा अलभ्य लाभ मला मिळाला . माझ्या मराठीची गोडी एवढी अवीट का आहे हे कळले . टाळ्या आणि मोकळ्या मनाने दिलेली दाद हेच लक्षात राहील .
संगीत नाटकं दुर्मिळ होत गेली . किंबहुना नगरकर रसिक प्रेक्षकांना संगीत नाटकं नगरमध्ये क्वचितच ऐकायला मिळाली . नाटक संपल्यानंतर मी असे नाटक पहिल्यांदा बघत आहे असे म्हणणारे खूप प्रेक्षक भेटले . एकंदरीत संगीत , अभिनय , कला , भाषा , संस्कृती या सर्वांचा एकत्रित मेळ घालून बनलेले आणि सादर झालेले हे नाटक नगरच्या इतिहासात अजरामर होईल .
धनश्री खरवंडीकरांनी साकारलेली सिंधू मात्र सर्वांच्या लक्षात राहिली . दारुड्या नवरा असूनही पतिव्रता म्हणून तिने प्राणांतिक संभाळलेला संसार डोळे ओले करून गेला . अनिकेत देऊळगावकर देखील प्रेक्षकांना सुधाकर होऊन भेटला आणि व्यसनामुळे आयुष्य उध्वस्त होईल हे ओरडून सांगत राहिला .नाटकातला तळीराम विसरणे केवळ अशक्यच .
लक्ष्मिशी सारीपाट खेळणारे तुमचे कुल आणि तुमच्यावर काय वेळ आली ? धनसंपन्नाची कन्या आणि ज्ञानसंपन्नाची पत्नी असून केवळ दारूमुळे सिंधूचे आयुष्य उध्वस्त होते . स्वतःच्या बाळाचा मृत्यू होतो .
'साताजन्माच्या पुण्यवंताने तुझ्या पायाचे तीर्थ घ्यावे ' , ' तू आजानतेपणे जात्यात मोती भरडले असते तरी कुणाला काही वाटले नसते ', 'गत पातकांचे मूर्तिमंत पिशाच्च माझा पिच्छा सोडत नाहीत ' , 'दुर्दैवाचे दशावतार पाहण्याची माझी इच्छा नाही ' अशी जड वाक्ये पण अभिनयाच्या या जादूमुळे या हृदयीचे त्या हृदयी पोचले , रुजले , सजले !
जेव्हा सुधाकर दारू सोडण्याची प्रतिज्ञा करतो तेव्हा आनंदाने सिंधू नाट्यपद म्हणते .
'प्रभू आजी गमला मनी तोषला
कोपे बहू माझा तो प्रभू राजा
आता हसला मनी तोषला '
हे पद आणि धनश्री खरवंडीकरांच्या आवाजाची जादू प्रेक्षकांना अक्षरशः वेडं करून गेली . टाळ्या टाळ्या आणि केवळ टाळ्या अख्ख्या सभागृहात भरून राहिल्या ! प्रकाश कुलकर्णी यांनी साकारलेल्या दोन्ही भूमिका जिवंत वाटल्या , भावल्या .
अनेक नाट्यपदं सादर झाली .तबला आणि ऑर्गनवर फिरणारी, आदळणारी बोटं देखील जादूमय होती . एकंदरीत एखाद्या जादुई सफरीवर जावं तसाच काहीसा हा अनुभव होता .
'स्वस्थ कसा तू उठ गड्या
झणी टाक उड्या
नकळे का वर्षे घन सुधेचा बाळा '
या पदाने अंगात शिरशिरी आणली .
अप्रतिम प्रयोग झाल्यामुळे ही दिवाळी पहाट लाखळखून निघाली . सभागृहात विनंती केल्यानंतर देखील वाजणारे फोन आणि त्यावर बिनदिक्कत बोलणारे प्रेक्षक होते . मधेच उठणे , दरवाजे उघडून बाहेर जाणे येणे , वेळ न पाळणे या सर्वांना बाजूला सारत कलाकारांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले . नाट्य पदांना वन्स मिळणारे मी पाहिलेले हे पहिले नाटक होते . सर्व कलाकारांना विनम्र अभिवादन ! मराठी मातीला साष्टांग दंडवत!
दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा .
-अजिंक्य
मस्त लिहिलंय भाई.. नाटकाला येऊ शकलो नाही, पण या लिखाणातून सगळं चित्र डोळ्यासमोर उभं राहिलं.. सभागृहात बसल्यासारखा फील आला.. हे नाटक पाहण्याचा योग आता पुन्हा कधी येईल कोण जाणे.. जादुई सफरीचा अनुभव मिस केला..
ReplyDeleteमिळेल सर , माणसाने आशावादी असावं .
Delete