मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ ....
दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते .
गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इतर वस्तू मांजर बोक्यापासून सुरक्षित राहाव्यात यासाठी मोठा कोनाडा आणि त्याला दार आणि कडी असायची त्याला 'फरताळ' म्हणतात .हे सगळे कोनाड्याचेच प्रकार पण उपयोग वेगवेगळे . पुढे कपाटे ,मांडण्या आल्या आणि हे शब्द अस्तंगत होत गेले .कोनाड्याला 'गोखला' असे म्हणल्याचे देखील ऐकिवात आहे .
कोनाडा हा दिवळीपेक्षा मोठा आणि चौकोनी असतो . त्यामध्ये एखादी कळशी किंवा छोटा हंडा बसेल एवढा मोठा देखील असू शकतो . भिंतीच्या रुंदीनुसार तो दोन अडीच फूट खोल असू शकतो . पूर्वी भिंतीची दोन मीटरपेक्षा जास्त रुंद असायची त्यामुळे कोनाडा सहज शक्य व्हायचा . शक्यतो घराच्या कोपऱ्यात असलेला तो कोनाडा असे आपण म्हणू शकतो . आमच्या जुन्या घरात दरवाजाच्या मागे भला मोठा कोनाडा होता . त्या कोपऱ्यात जाताना माझी पाचावर धारण बसायची . जुने खणाचे घर असल्याने आणि त्यात खिडक्यांच्या अभाव असल्याने अंधारच जास्त असायचा . पूर्वी कपाटे आणि मांडण्या नसायच्या त्यामुळे कोनाड्यांना महत्व होते .
तर त्या कोनाड्यात गणपती गेल्यानंतर त्या महालक्ष्मी ठेवल्या जायच्या . आता या महालक्ष्म्या ( गणपती उत्सवात येणारा धार्मिक कार्यक्रम ) सजवल्यावर सुंदर दिसतात पण एकदा ती सजावट उतरवली की भयंकर भीतीदायक दिसतात . त्यांच्या भल्यामोठ्या काळ्या भुवया , पांढरे डोळे , टोकदार नाक बघितले की मला खूप भीती वाटायची . ते मुखवटे पितळी आहेत आणि खूप जड आहेत . आता भीती कमी झाली आहे पण त्यावेळी कोनाड्याकडे बघायची सुद्धा हिम्मत नव्हती .दादांच्या ( आजोबा ) भुताच्या गोष्टी ऐकलेल्या असल्याने भूत म्हणून त्याच महालक्ष्म्या पुढे यायच्या . कोनाडा शब्द आठवला की मला ते घर आठवते .
दिवळीविषयी देखील माझी विशेष आठवण आहे . मी चार पाच वर्षांचा असेल तेव्हा आमच्या सपरात एक दिवळी होती . आमचे सप्पर खूप छोटे होते . त्यावेळी त्यात एक खाट( कॉट) होती .शेजारी थोडी मोकळी जागा आणि लगेच भिंत . दुसऱ्या बाजूला म्हशीची खुंटी होती . मोठी म्हैस त्या सपरात कायम असायची . उन्हाळ्यात तिला बाहेर बांधत असू पण पावसाळ्यात ती शेजारीच असायची . दिवळीत एक काळी भंगार चिमणी ( रॉकेलचा दिवा ) जळत राहायची . तिच्या मिणमिणत्या प्रकाशात सपराचे गवत बघत निवांत झोप लागायची . त्या दिवळीत रॉकेलच्या धुरामुळे वरच्या बाजूने एक मोठी काळी रेषा तयार झाली होती . वरचे गवत देखील काळे पडले होते . चिमणी या शब्दावर पुढच्या एखाद्या लेखात सविस्तर आठवणी सांगेन . दिवळीत काडीपेटी ,चिमणी ,घड्याळ अशा छोट्या गोष्टी असायच्या .
दिवाळीत दिवळीमध्ये शांतपणे जळणारी पणती मात्र मी तासनतास बघत राहायचो . पणती आणि तिचा सोज्वळ शांत प्रकाश माझ्या काही आवडत्या गोष्टींपैकी एक आहे . झोपडीतला अंधार दिवळीतल्या दिव्याने उजळून निघायचा आणि त्याला सोनेरी मुलामा मिळायचा ! यावेळी म्हशीचे चमकणारे डोळे सुद्धा खूप सुंदर दिसायचे . अशी दिवळी आमच्या विहिरीत सुद्धा आहे . तिथे कसल्यातरी शेंदूर फासल्या देवाची पूजा आम्ही दसऱ्याला करतो . पावसाळ्यात ही दिवळी त्या देवासकट पाण्यात असते .
आपल्या प्रत्येकाच्या आठवणीत देखील एक आठवणींचा कोनाडा असतो . त्यात आंबटगोड ,तिखटमीठ आठवणी प्रत्येक जण जपून ठेवतो . माझ्याही मनात दिवळीला आणि कोनाड्याला मनाचे स्थान आहे . माझा कोनाडा अंधाराने भरलेल्या खोलीला प्रकाशाने भरून टाकणारे चैतन्य घेऊन कायमचा तत्पर असतो !
Mazya pan ghri hoti दिवळी ।
ReplyDeleteAj tuza ha लेख वाचून Mal tya दिवसाची आठवन आली ।
Khup chhn लिहल आहेस तू ।
माझ्या जुन्या घरात पण दिवळी(देवळ) होती आणि नवीन घरात पण देवळ देवण्यात आली आहे.बाकी लेख खूप मस्त लिहिला आहे.
ReplyDeleteKharch khup chan ahe mauli mast lihil ahe
ReplyDeleteमस्त यार
ReplyDeleteखूपच सुंदर ...सुरेख शब्द रचना.....लहानपणी वाड्यात राहीलेले दिवस आठवले...👌👌👌👌
ReplyDelete