तुम्ही म्हणाल केळी मला माहीत आहे .पण नाही! गावाकडे 'केळी' या शब्दाचा एक वेगळा अर्थ होतो . खायची केळी आणि आज ज्यावर लिहिणार आहे ती 'केळी' संपूर्ण वेगळी आहे . गावाकडे 'केळी' शब्दाचा अर्थ छोटा माठ असाही होतो . आहे की नाही गम्मत ! माडक्यांपेक्षा थोडी मोठी आणि माठापेक्षा थोडी छोटी ती केळी .
शक्यतो गावाकडे सगळी श्रमिक मंडळी असतात . दिवसभर उन्हातान्हात काम करणारी ही मंडळी खेड्याचं चैतन्य असतात .सगळी कामे अगदी ठेपशिर सुरू असतात . व्यवहार देखील शांत असतात .आजकाल राजकारणामुळे गावाकडे देखील माणसांची थेरं बदलली आहेत . ते मी पण मान्य करतो .
असो , केळी हा प्रकार उन्हाळ्यात जास्त पहायला मिळतो .कारण उन्हाळ्यात थंड पाण्याची जास्त गरज असते . थंड पाण्यासाठी एकतर विहिरीत उतरून पाणी प्यावं लागेल नाहीतर पाणी थंड राहील याची दक्षता घ्यावी लागेल . पाणी जर तांब्याच्या ,पितळेच्या किंवा स्टीलच्या भांड्यात ठेवले तर लवकर कक्ष तापमानाला येते .थंड राहत नाही . खेड्यात फ्रीज आहेत पण लाईट नसते . अशा वेळी जुने ते सोने या न्यायाने केळी आणली जाते .
मोठ्या आकाराचा माठ सांभाळायला सोयीचा नसतो .तसेच तो लवकर फुटू शकतो कारण जेवढा मोठा माठ तेवढा त्याच्या बाजूंवर ताण जास्त असतो .केळी मात्र छोटी असते .एका कळशी इतके पाणी त्यात बसते .त्याचे काठ माठाच्या तुलनेत जाडजूड आणि भक्कम असतात .त्यामुळे फुटण्याचा धोका कमी असतो . अशी ही केळी झाडाच्या बुंध्याला ठेवली की मग काय 'थंडा जल पीजीए , कभी भी कही भी ' !!
एकदा आमच्या घरी 'अवचित्या' नावाचा सुतार आला होता . माझे वय 5 वर्षे .त्या अवचित्याची सेवा हे माझे नित्यकर्म होते .तो गावातला सुप्रसिद्ध सुतार होता आणि बैलगाडी बनवण्यात त्याचा हातखंडा होता .तर आंब्याच्या झाडाखाली त्याचा संसार त्याने थाटला . दांड्या वगैरे मारून साधारण 20 दिवस तो येत असावा .तो आला की विहिरीतून केळी भरून आणायची .आंब्याच्या खोडाशी ठेवायची आणि त्याचे काम न्याहाळत बसायचे हा माझा नित्यक्रम झाला होता . उन्हाळ्याचे दिवस असल्याने शक्यतो त्या आंब्याखाली सगळेच जमायचे .मी त्यांच्यात रमायचो .तर तो अवचित्या तोंडात तंबाखूचा निबर विडा भरायचा .कानाला पेन्सिल अडकवून काम करायचा .त्याचे कसब वाखाणण्याजोगे होते .एके दिवशी त्याने सकाळी 11 वाजता मला केळी भरून आणायला सांगितली .मी उरलेले पाणी ओतून देण्याच्या उद्देशाने केळीचे काठ धरले आणि मला दणका दिल्यासारखा दंश झाला . प्रचंड वेदना आणि मी रडायला लागलो . काही मिनिटातच वेदना अख्या हातात पोचली . नंतर काय झाले आठवत नाही पण जागा झालो तेव्हा आईच्या मांडीवर डोके होते .मला विंचू चावला होता .विंचू चावण्याची ती पहिलीच वेळ .केळीच्या गारव्याला साप ,विंचू , गांडूळे , मधमाशा येतातच .त्यामुळे जपून रहावे लागते .या प्रसंगाने मला ती केळी चांगली स्पष्ट आठवते .
केळीला सुद्धा काही पर्याय बाजारात आले पण ते एवढे लोकप्रिय झाले नाही .माठातले थंडगार शुद्ध पाणी प्यायल्यावर स्वर्गसुखाची अनुभूती मिळते . ही खरी श्रीमंती आहे असे मी मानतो .पूर्वीचे लोक केळीच्या आठवणी सांगतात . "डाऱ्या बाबूचा एकनाथ दोन केळी पाणी एकदम प्यायचा" ."अमक्या अमक्या पाणी प्यायला लागला की झरा आटायचा" . "तमका तमका हंडाभर पाणी पेला ना भो ! " अशी वाक्ये ऐकली की आपण किती क्षुद्र आहोत याची कल्पना करत मी शांत होतो .
एका वेळी दोन केळी पाणी पिल्यामुळेच ती माणसे पाण्यासारखी नितळ होती का ? असा विचार करत मी ' केळी' या विषयावरचे लेखन थांबवतो .
-अजिंक्य
ते डाऱ्या बांबूचा एकनाथाचं चांगलं होतं .. बाकी छान. आमच्याकडे कांदे काढतानाच्या गरम ढेकळात हात केळीच्या थंड पाण्याने हात धुण्यापासून ते कांद्याची पात आणि बुक्कीने फोडलेला खोबर्यासारखा कांदा तोंडी लावायला असला की केळीचं पाणी पिऊन हे लांबलचक ढेकर द्यायला बरं वाटायचं...
ReplyDeleteछान वाटलं वाचुन खरंतर मला सुद्धा फक्त खायची केळी माहिती होती. यातुन तुला आलेला अनुभव तु व्यक्त केलास. आणि मला ही केळी बद्दल म्हणजे ज्यात फक्त कळशी एवढं पाणी बसतं ते समजले. पण ज्ञान मात्र विहिरीच्या पाण्या एवढं मिळालं. ����
ReplyDeleteअसे वाचक असतील तर लिहायला मजा येते .
DeleteKhup mast ahe bhau chan ye khup
ReplyDelete