Skip to main content

प्रासंगिक 5 : ललित

अंगाला झोंबणारा उष्ण वारा , काळी ठिक्कर पडलेली गोडी बाभळ , वाळलेलं अर्ध मार्ध खाल्लेलं कसन आणि वाऱ्याबरोबर हलणारी त्याची निष्प्राण पाती , अंधुक निरभ्र आकाश , सगळं काही निराशादायक .  पाऊस नावाचं चैतन्य हरवल्यामुळे . समोर चरणारं हडकुळं वासरू आणि त्याच्या पाठीमागे खपाटलेल्या पोटाची मोठ्या शिंगाची गाय . निष्प्राण गवत खाऊन प्राणपूजा करत ते जगत आहेत . दुपारपेक्षा संध्याकाळ बरी असं म्हणत निवांत जे मिळेल ते पोटाच्या पिशवीत भरण्याची त्यांची सुरू असलेली धडपड . दूरवर दिसणारा एखादा हिरवा ठिपका पण अवतीभोवती पडलेली नुसती आग . येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक पावलाबरोबर वाटेवर उडणारा धुरळा पुन्हा शांत पडतो . सगळे कसे अंधाराच्या अनामिक कुशीत झोपायला सज्ज ....



मावळतीला उधळलेला लाल , केशरी, पिवळा रंग . रंगामागे भौतिकशास्त्र आहे की निर्मात्याची सौंदर्यदृष्टी? हे विश्व रंगहीन आहे तरी रंग बघण्यासाठी डोळ्यांची असलेली क्लिष्ट रचना . दिवसाच्या संपण्याचे दुःख आहे की नव्या प्रभातीची प्रतीक्षा ?  अनेक प्रश्न , उत्तरं , संकल्पना , विचार ,विचारप्रवाह , सत्य , असत्य ,  प्रतिभा , प्रतिभेचं मोजमाप , तंत्र , मंत्र , ज्ञान , मन , बुद्धी ,प्राण ,  जाणीव , नेणीव , वलय , कंपन , मुक्ती , विरक्ती सारं सारं क्षणभंगुर तरीही सुरू चिरंजीव असल्यासारखं !

अंधार देखील चिरंजीव असल्यासारखा पडतोय . उद्याच्या पहाटेचा भरवसा नसताना दुर्दम्य असलेला विश्वास . अंधार निदान अश्रू , हास्य , रडू , वेदना सगळ्या लपवतो . चोरून बघत नाही , कागाळ्या करत नाही . वातावरणात थोडासा गारवा होतो आणि त्यात सूर्य जसा जसा बुडेल तशी होत असलेली वाढ .  आकाशात ढगांचे तरंगणारे तुकडे. एखादी  निवांत फिरणारी घार . बाकी काहीही नाही .
अनेक आठवणींचा कल्लोळ आणि सूर्याच्या सोनेरी रंगात उजळणारी प्रत्येक वस्तू . शांत तरी सुरू असलेला प्रचंड कोलाहल . सगळे शांत होत असताना वाढणारी उलघाल . ती सहन करत लवकर अंधार पडावा म्हणून वाट पाहणारा मी .  दमलेला , पावसाची आणि अजून अनेक गोष्टींची विनाकारण वाट पाहणारा मी .....

-अजिंक्य

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 12 : जवारी आळाशे पाचूंदा वळ्हई आणि बरंच काही ...

आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं . नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत . असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते . एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नस...