एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते .
सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन !
सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एकूणच समाजाची दिशा ठरवली जावी , कालानुरूप धर्माची चिकित्सा करून योग्य अयोग्य याचा निवाडा व्हावा यासाठी या सात दिवसाच्या उत्सवाची संकल्पना मांडली गेली . समानतेच्या एका सूत्रात समाज बांधला जाईल असा अध्यात्मविचार सर्वच संतमंडळींनी रुजवला . वारकरी संप्रदाय ही अंधश्रद्धा, भेदभाव , अस्पृश्यता , उच्चनीचता या सर्वांच्या विरोधात काम करणारी चळवळ बनली . भगवी पताका हातात धरून विठुरायाच्या गजरात संपूर्ण महाराष्ट्र एकत्र होतो हीच या अध्यात्माची जादू ! हाच सप्ताह पुढे पोट भरण्याचे साधन , पैसे कमावण्याचा मार्ग , राजकीय पोळी भाजण्याचा तवा , शक्तीप्रदर्शनाचे मैदान अशी वेगवेगळी रूपे घेऊन पुढे येत गेला .
आता आता सप्ताह म्हणजे सात दिवस कीर्तन , प्रवचन , आरती आणि मुख्य म्हणजे महाप्रसादाच्या नावाखाली भरपेट जेवण एवढंच शिल्लक राहिले आहे . किर्तनकाराच्या बिदागिपासून विण्यावाल्याच्या रोजापर्यंत आणि भटजींच्या दक्षिणेपासून डीजेच्या पेमेंटपर्यंत फक्त पैसा वाहत असतो . याबदल्यात मिळतो तो ज्याचा त्याचा वेगळा आनंद . प्रबोधनाचा मूळ हेतू कुठे जातो हे त्या उत्सवमूर्तीला देखील कळत नसेल !
आता आपण थोडे कीर्तन या भागाकडे वळू . महाराजांची तारीख मिळवण्यासाठी आधी संयोजकांना धडपड करावी लागते . सगळ्या महाराजांच्या तारखानुसार अरेंजमेंट झाली की मग पुढचे शेड्युल तयार होते . महाराजांची केवळ अदलाबदल होते . म्हणजे या गावतले महाराज त्या गावात आणि त्या गावतले महाराज या गावात . त्यांची फी वगैरे सगळं ठरलेलं असतं . फी न घेता कीर्तन करणारे महाराज देखील आहेत पण कमीच .
आता हे महाराज म्हणजे एकमेकांचे मित्रच त्यामुळे एकमेकांची किंमत कमी होईल असे कुठलेही काम करत नाहीत . अगदी कीर्तनात अभंग कोणता घेणार आणि कोणती प्रमाणं द्यायची हे सुद्धा ठरते . पाखवाद्या , पेटीमास्तर , गायक गावातले कीर्तनकार अशी ती बैठक लै मजेशीर असते . सगळे पांढरे कपडे , त्यावर चोपून बसवलेले उपरणे , महाराजांची चाललेली सरबराई , लोड , गाद्या सगळं अगदी इथंबूत ! कोरीव दाढी , त्यावर मोजून लावलेला बुक्का , हातात गंडेदोरे , शर्टच्या खिशात हरिपाठाचे बाहेरून इझिली दिसेल असे पुस्तक असा सर्वांचा युनिफॉर्मच !
गावातल्या महाराजांची पत्नी मात्र पुरती कंटाळलेली असते . रोज नवीन बुवा आणि बाबा . नुसती सेवा करायची . पण तिलाही करावीच लागते . या बैठकीत महाराज महाराजांसारखे वागत नाहीत . स्पष्ट शिव्या , अश्लील भाषा , टिंगल टवाळ्या , विनोद आणि बीभत्स हसणं हे सगळं असतं . मग काय अमका महाराज असा , तमक्याची मी तशी मारली इथपासून ते थोडी घेतल्याशिवाय त्यांना जमतच नाही इथपर्यंत सगळ्या गप्पा होतात !!!!
एखाद्या संस्थेत शिकलेला कीर्तनकार अगदी ठाशीव विचार करणारा असतो . दुसऱ्याचे विचार ऐकून घेण्याची त्यांची क्षमताच नसते . अध्यात्म हे एक प्रकारचे तत्वज्ञान आहे आणि जगात अशा अनेक विचारधारा आहेत . पद्धती आहेत . पण त्यांची दृष्टी बहुदा विस्तारलेली नसते . त्यांचा एकाच गुरूवर निस्सीम भक्ती असते . त्याच्या आज्ञेपुढे अख्ख आयुष्य फिकं असतं . त्यामुळे त्यांच्या विचारकक्षांना एक चौकट जाणवते .व्यक्तिपूजा कधीही घातकच.
स्वभावातला ठाशीवपणा त्यांना प्रगती करू देत नाही . दरम्यान त्यांच्या परिघाबाहेरचा कोणी आला तर मात्र ते भडकतात . पोथ्या पुराणातली कवणं , ओव्या , ओळी, अभंग जे मिळेल ते तुमच्या तोंडावर फेकतात . तरीही आपण नाही ऐकले तर हातात पडेल ते फेकायला धावू शकतात . त्यामुळे सावधान !
असो मी अनेकदा या कचाट्यात सापडलो आहे .
एकदा एक महाराज अशाच बैठकीत बोलत होते . त्यांना एका पखवाद्यानी काहीतरी आगाऊ वाजवून त्रास दिला . मग काय त्यांचं डोकं फिरलं आणि त्यांनी अशी काही चाल काढली की तो पखवाद्या गारच ना ! हे सांगताना त्यांची छाती गर्वानी फुलून आली होती . मग असेच अनुभव दुसऱ्या महाराजांनी सांगितले . अशा वेळी गावातल्या काही देवभोळे लोक थेट या खासगी बैठकीत येऊन महाराजांची भेट घेतात . पाय अक्षरशः हातात घेऊन दर्शन घेतात . डोकं ठेवतात . अगदी सेम कंडिशन पहिल्यांदा आधार कार्ड काढताना झाली होती . हे कार्ड म्हणजे सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे की काय असा भास त्या वेळी लोकांना होत होता . मग हे देवभोळे लोक बाहेर जाऊन आपण महाराजांना कसे भेटलो हे सांगतात . त्यांच्याही वेगळ्या चर्चा सुरू होतात . हे सगळे सुरू असताना माईकवर अनोन्समेंट होते . "कीर्तन सुरू होत आहे ! चला टाळकरी , माळकरी , वारकरी आणि भाविक भक्तांनी मंदिरात यायचं आहे !"
अशी घोषणा चार पाच वेळेस दिल्यावर चार दोन टाळ एकमेकांना आदळायला लागतात . 'मग महाराज आम्ही होतो म्होरं' अस म्हणत गायक पुढे निघतात . चार दोन टाळकी पुढे असतात , बाकीचे देवळाच्या मागे असतात . कोण लघवी करून घेतो . कोण एक बिडी दोघात वढून घेतो . मस्त ठोकून तंबाखूचा निबार गुळणा धरून पब्लिक हळूहळू मंडपात येऊन बसायला सुरुवात होते . या संध्याकाळी नऊ वाजण्याच्या सुमाराला सर्वांचे डोळे 75% तारवाटलेले असतात . ( आधी महाप्रसाद कम जेवण रेटलेले असते .) पखवाज पेटीच्या दोन स्वरांवर लावून गायक राम कृष्ण हारी सुरू करतात . हळूहळू टाळ ठेका धरून वाजायला लागतात आणि मंडप भरायला सुरुवात होते . भारतीय प्रमानवेळेनुसार हे सर्व सव्वा नऊच्या आसपास सुरू असते .
साडेनऊ वाजेपर्यंत लोचनी रूप पाहून झालेले असते आणि विठ्ठल विठ्ठल चा जयघोष सुरू झालेला असतो . महाराज धीम्या लोकलसारखे पावलं टाकत व्यासपीठावर येतात . एक वेगळेच चैतन्य व्यासपीठावर निर्माण झालेले असते . मघाशी खोलीत बसलेला महाराज आणि आता उभा असलेला महाराज यात जमीन अस्मानाचा फरक असतो . फेटा बांधल्यामुळे भलताच रुबाब चढलेला असतो . एका हातात धोतराचा सोगा पकडून महाराज माईकसमोर येतात . त्यांच्या धोतरातून कधी कधी बरमुडा दिसत असतो ही विशेष उल्लेखनीय बाब . महाराज दोन हातांनी इशारा करतात आणि विठ्ठल विठ्ठलाचा जयघोष थांबतो . प्रचंड मोठी शांतता असते आणि एवढ्यात एक कुत्र्यांची कळवंड सर्वांचे लक्ष वेधून घेते . महाराजांसकट सगळे पाच मिनिटं तिकडे बघतात . यामध्ये संयोजकांची तारांबळ करणे एवढाच त्या कुत्र्यांचा हेतू असतो . त्या शांततेत पखवाद्या आपली बोटं मधून मधून चांगली चाळून घेत असतो . मैदानात पसरलेली कणिक चांगली दाबून घेतो . ( मैदान - मृदंगाची मोठी बाजू ) नेमका या वेळेस पखवाज कसा उतरतो याचे गणित मला अजूनही कळले नाही . ( पखवाज उतरणे - पखवाज सुर सोडून वाजणे) . मग घाईघाई पखवाद्या गठ्ठे सरकवतो . अशा वेळी नेमका हातोडा हरवलेला असतो आणि मग टाळाचा आधार घेऊन पखवाज जागेवर आणला जातो . मग त्याला आडवा पाडला की पाखवाद्या असा काही जोमात येतो की ज्याचं नाव ते !
त्यानंतर सुंदर ते ध्यान झाल्यानंतर हळूच पुडी सोडावी तसे महाराज अभंग काढतात . मग शक्यतो तो अभंग तुकाराम महाराजांचा असतो . या वेळी महाराजांकडे तुकरामांसाठी एवढी विशेषणे येतात कुठून हा एक पीएचडीचा विषयच ! मग चाल म्हणण्यासाठी गायक पुढे येतात . जसं गायक सूर लावतात तसं लोकांना काहीच कळत नाही . यामध्ये मुख्य बाब अशी की माईक सिस्टिमची अरेंजमेंट अशी केलेली असते की गायन म्हणजे समोरच्याला कुत्र्यांची कळवंड वाटावी . यामध्ये गाणं सुरू असताना भरपूर इको देण्याची त्यांची सेटिंग झालेली असते . उपस्थित सर्वनांना साउंड सिस्टीम मधील फक्त बास आणि इको एवढेच फॅक्टर कळत असतात . त्यामुळे महाराजांच्या अभंगाचे एकही वाक्य व्यवस्थित उमजत नाही . खडीमशिन चालू व्हावी तसा पखवाज वाजत असतो .
चाल झाल्यानंतर विणेकरी महाराजांच्या हातातून विना खांद्यावर घेतो . ही विना घेणे ही त्याच्यासाठी प्रतिष्ठेची बाब असते . विठ्ठलाच्या नामाच्या गजरात महाराज उपरणे काढतात . स्वतःच्या अजस्त्र ढेरिखाली ते पद्धतशीर बांधतात . त्या उपरण्यावर ढेरी अशी काही चढते जसा चुंभळीवर माठ ठेवावा . ढेरीवरून हात फिरवत कीर्तन सुरू होते . मध्ये मध्ये प्रमाण देणे ही गायकाची हुशारी दाखवण्याची संधी असते . ओव्हरऑल उपस्थित भाविक भक्तांना जागे ठेवणे हीच किर्तनकाराचं खरं कसब . बाकी ज्ञान , अध्यात्म , विचार या सगळया फॉर्मलिटीच ! चमत्काराच्या आणि देवाचा उदोउदो करणाऱ्या कथा आणि तोंडी लावायला थोडासा विनोद हीच यशस्वी कीर्तनाची ठळक वैशिष्ट्ये . टाईमपास करण्यासाठी कारणे कमी म्हणून की काय उपस्थित यजमानांचे भ्रमणध्वनी वेगवेगळी गाणी घेऊन वाजतात . अशा वेळी विशेष देवाचं गाणं रिंगटोन म्हणून फिट केलेलं असेल तर संबंधितांची छाती गर्वाने फुगते . यानिमित्ताने महाराजांना थोडा दिलासा मिळतो . महाराजांसाठी असे लोक 'दिलासा पथक' म्हणून काम करतात !
कीर्तन सोडून महाराजांचे पेटी आणि मृदंगकडे विशेष ध्यान असते . त्यांना मार्गदर्शन करायला महाराजांसाठी ती सुवर्णसंधी असते . अशी संधी ते सोडत नाहीत आणि वादकांना राग आला तर त्यांची तालासुरात एकमेकांना पकडून अडकवण्याची धडपड शेवटपर्यंत जाणवते . अशा खेळीमेळीच्या वातावरणात कीर्तन शेवटाला जाते . मधेच महाराज अभंगांचा चरण क्रमांक सांगतात . चरण क्रमांक चुकला तर ती संधी उपस्थित लोकांमधील एखादा सोडत नाही . मग महाराजांना तोंडावर पडल्यासारखे वाटते . पण महाराज ते विठ्ठलाच्या गजरात रेटून नेतात . एकदा विठोबा राखुमाईचा गजर झाला की कीर्तनाची रेल्वे स्टेशनला पोचल्याचे वऱ्हाडी मंडळींना कळते . मग महाराजांना हार घातला जातो आणि कीर्तन संपते .
कीर्तनाच्या शेवटी महाराज संयोजक मंडळींची नावे घेतात . आणि जय विठ्ठल झालं की वाळलेले कपडे खाली पडावेत तसे टाळकरी बसायला जागा शोधतात . यामध्ये वीणा वाल्याची पंचाईत होते . तो पर्यंत उपस्थितांनी लघवी करण्यासाठी मार्गक्रमण केलेलं असते . अशा वेळी कितीही पट्टीचा कलाकार असला तरी पब्लिक थांबवणे त्याला शक्य होत नाही .
ढुंगणाखाली चेपलेले कातडी जोडे हातात घेऊन हे सगळे विजयी सैन्य घराकडे निघते . त्यांच्या डोक्यात घरी बायको दार उघडेल का ? असा प्रश्न असतानाच अनौन्समेंट होते की 'या ठिकाणी एक चावी हरवलेली आहे , चावीला गणपतीचे किचन आहे तरी कुणाला सापडल्यास आणून द्या ' . मग निघालेले सैन्य चालता चालता आपल्या चाव्या तपासून बघतात . या ठिकाणी बिदागिदाते यांच्या नावाचा उल्लेख होतो आणि बाजूबंद पाकीट महाराजांच्या खिशात जाताच कार्यक्रम संपला असे जाहीर होते . बॅकग्राउंड म्युझिकमध्ये उद्याचे अन्नदाते , प्रवचनकार , कीर्तनकार , कार्यक्रमांचे टायमिंग , हरवलेल्या वस्तू , आडव्या लावलेल्या गाड्या , लांब वस्तीवर जाणाऱ्या गाड्यांची माहिती अशी अनौन्समेंट सुरू असते .
पुन्हा टाळकरी , गायक आणि महाराजांची खासगी बैठक सुरू होते . एकमेकांना सुहास्यवदनाने धन्यवाद देतात . जवळजवळ सगळे दिवस असेच जातात . आपण जर एकाच महाराजांना दुसऱ्यांदा ऐकत असू , तर मात्र प्रमाणं, विनोद रिपीट असल्यामुळे प्रचंड बोर होतं. एखादा मोठा महाराज हे सप्ताहाचे आकर्षण असतो . त्याच्या कीर्तनाला थोडा वेगळा साज असतो . ते महाराज त्यांचा सगळा लवाजमा घेऊन येतात त्यामुळे त्यांचे कीर्तन मात्र राजकारण फ्री होते . असे कीर्तन शक्यतो काल्याच्या (काला म्हणजे सप्ताहाचा शेवटचा दिवस) दिवशी असते. सगळ्याच काल्याचे कीर्तने एकसारखी असतात, त्यामुळे ती प्रचंड कंटाळवाणी असूनसुद्धा कीर्तनाला प्रचंड गर्दी असते. त्याचं कारण म्हणजे आठवडाभर रटाळ भात, भाजी, लापशी असं काँक्रीट भोजन खाऊन कंटाळलेल्यांना या दिवशी विशेष भोजन असते.
आता या सप्ताहाच्या चांगल्या गोष्टींवर प्रकाश टाकू. सप्ताह हे आपल्या उत्सव प्रियतेचं लक्षण आहे. या निमित्ताने गावातील तरुणांना नेतृत्व करण्याची संधी मिळते. यामधून पुढे जरी दादा, भाऊ, खंबीर नेतृत्व निर्माण होत असेल तरी, त्यांच्या नेतृत्वगुणांना इथूनच वाव मिळतो. आज्जी, आजोबांच्या नजरेत हे तरुण पोरं देवाच्या मार्गाला लागल्याचे समाधान असते. पखवाज, हार्मोनियम आणि इतर वाद्य, कला, भाषण, गायन, सभाधिटपना, असे गुण विकसित करण्याची ताकद या सपत्यामध्ये असते.
सप्ताहात नियोजनासाठी खूप मोठी फौज लागते, त्यामुळे अनेकांना गावमध्येच सात दिवस रोजगार उपलबध होतो यामध्ये, साऊंड सिस्टीम, आचारी, पौरोहित्य, वादन, गायन , बॅनर छपाई, वाहन चालक, मंडप डेकोरेटर्स, किराणा दुकानदार, पाणी व्यवस्था, आणि कर शेवटच्या दिवशी यात्रा भरली तर खेळण्यावाल्यांना देखील रोजगार मिळून मोठी उलाढाल होते. यातून अनेकांच्या ओळखी वाढतात आणि रोजगाराच्या संधी सापडतात.
या निमित्ताने माईकवरून बसल्या बसल्या म्हाताऱ्या बाया गाणी म्हणतात, त्यासाठी त्या माईक वाल्याशी भांडताना सुद्धा आढळतात. या गाण्यांमधून जुनी संस्कृती, भारुडे, ओव्या, कथा, जात्यावरची गाणी, परंपरा, चालीरीती, यांची माव्या पिढीला ओळख होते आणि यांची नव्या पिढीला ओळख होते, परिणामी हे साहित्य जिवंत राहते. अगदी पूर्वीपासून आपण आपल्या साहित्याचं हस्तांतरण बहुतांशी मौखीकच करत आलो आहोत. त्यामुळे हादेखील त्याचाच एक भाग. त्यामुळे नव्या पिढीच्या विचारकक्षा रुंदावतात. सकाळची काकडारती तर अनेकांना आठवत देखील नसेल .
आजकाल म्हातारी माणसं हि प्रत्येकालाच अडगळ वाटते, त्यामुळे अशा माणसांना घरात फार सासुरवास होतो. काही ठिकाणी त्यांना हाकलून देण्याचे प्रकार देखील घडतात. अशा दुर्लक्षित लोकांसाठी सप्ताह हि खऱ्या अर्थाने आनंदाची बाब असते. हे सगळे लोक अगदी पारावर जमल्यासारखं मंदिरात जमतात आणि एका कुटुंबासारखे राहतात. काही आर्थिक हलाखीची कुटुंबही गावात असतात, त्यांनाही देव सामावून घेतो. त्यांच्या दोन वेळ रोजीरोटीचा प्रश्न सात दिवस का होईना पण सुटतो.
यानिमित्ताने विविध पक्षांचे राजकीय नेते एकत्र पाहायला मिळतात. देवाच्या नावाखाली काहोईना त्यांच्यातील राजकीय मतभेद बाजूला राहतात. यामध्ये अजून एक योग्य गोष्ट घडते ती, देवाच्या श्रद्धेपायी एखाद्या महाराजाच्या संगतीने गावातला व्यसनी माणूस एक दोन वर्षे का होईना व्यसनाला बाजूला ठेऊन चांगल्या विचारांचा पाईक होण्याचा प्रयत्न करतो.
तसं पाहिलं तर सप्ताह लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम. याच वारकरी सांप्रदायाने अनेक पिढ्या घडवल्या, त्यांना नितीमूल्यांचा ओलावा दिला. आज समाज जीवनात जो कोरडेपणा बघतो, तो याच अध्यात्मविचाराच्या आणि नितीमूल्यांचा अभावामुळेच !! प्रेम, दया, क्षमा, शांती, करुणा हि मूल्ये म्हणजे आपल्या जगण्याचा गाभा आहेत. आजकालच्या शिक्षण पद्धतीमध्ये नितीमूल्यांचा अभाव जाणवतो. पण हजारो वर्षांच्या आपल्या संस्कृतीने हा वसा अविरतपणे पुढे चालू ठेवला आहे. देव हा प्रत्येक संस्कृतीतील महत्वाचा भाग . अध्यात्म विचारांनी अंधश्रद्धा दूर सारण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
संतवाङ्ममय हा मराठी साहित्याचा गाभा आहे. जागतिक तत्वज्ञानाला भिडू शकेल किंबहुना जगातल्या सर्व विचारप्रवाहांचं नेतृत्व करू शकेल असा मूळविचार या संतांनी मांडला. ठायीच बैसोनि करा एकचित्त म्हणतानाच ईश्वर आणि आपल्यामध्ये दलालांची गरज नसते हे उघड केले. याच चळवळीने ब्राह्मण्यवाद्यांचे वर्चस्व झुगारले आणि समता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले.
मुख्य म्हणजे स्त्री पुरुष दरी कमी केली आणि महिलाही भक्तिमार्गात तितक्याच सन्मानाने सामील झाल्या. आजच्या युगात वाढलेला स्वैराचार, बिघडलेली कुटुंबव्यवस्था, पाश्चिमात्य संस्कृतीचं आक्रमण, बोकाळलेला चंगळवाद, या सर्वांविरुद्ध संतविचार पर्वतासारखा उभा राहिला.
एकीकडे तंत्रज्ञानातील प्रगती, आयटी क्षेत्राची भरमसाठ वाढ, आणि सुखवस्तू जिवनपद्धतीकडे झुकणारे तरुण हे वास्तव असताना पांढरे कपडे घालून हातात टाळ घेणे हे वाटते तितके सोपे काम नाही. डोक्यावर फेटा बांधून निर्बुद्ध समाजाला खऱ्या ज्ञानाचा प्रकाश पाजणं हे काम आज लाखो तरुण करत आहेत. आयुष्याला वैचारिक आणि मानसिक स्थैर्य देण्यासाठी या तरुणांची हि लढाई खरंच वाखाणण्याजोगी आहे. टीकाटिप्पणी सहन करत ते वारकरी संप्रदायाची पताका ते अभिमानानं मिरवतात. समाजाला एकत्र राहून ते नवी स्वप्न बघायला शिकवतात. कीर्तन प्रबोधनाचा एक मार्ग मानून समाज उत्थानाचे हे कार्य असेच चालू राहायला हवे. राजकारणापासून आणि भोंदूबाबांपासून दूर जात नितळ अध्यात्मविचार मांडणे हि काळाची गरज आहे. बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले असे म्हणत आपण सर्वजण या दैदिप्यान संस्कृतीचे पाईक होण्याचा प्रयत्न करू.
-अजिंक्य
👌👌👌👌👌
ReplyDeleteएकुणच खुप अभ्यास झालेला दिसतोय सप्ताह या विषयावर. नाण्याच्या दोनही बाजू खुप सुंदर प्रकारे उजेडात आणल्या आहेत. काही आतल्या गोष्टीही नव्यानेच वाचायला मिळाल्या.. तरी आत्ताचे तरूण कीर्तनकार अभंग हे हिंदी चित्रपटांतील गाण्यांच्या चालीत किती सुंदर म्हणतात हे स्पष्ट करायच राहीलच ! आत्ताच्या घडीला स्वतःची शिक्षकीपेशाची सरकारी नोकरी असतानाही विना मोबदला कीर्तन सेवा देणारे कीर्तनकारही आहेत. पण त्यांना ही अपमानास्पद वागणूकीला सामोरं जावं लागतं, ते ही फक्त गावातील जातीय राजकारणामुळे! अशा वेळी या सगळ्या गोष्टींचा हेतु काय असावा? असा प्रश्न निर्माण होतो...
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteअभ्यासपूर्ण लेख!!
ReplyDeleteकिर्तन हा पैसे कमवायचा धंदा झालाय. स्वत आईवडील मुलांना कागदावर कीर्तन लिहून पाठ करायला सांगतात आणि माझा मुलगा बालकीर्तनकार आहे म्हणून. त्याच्या शिक्षणावर गदा आणतात.
ReplyDeleteशोकांतिका......
टाळकरी कमी आहेत पण, कीर्तनकार घरोघरी आहेत.