आयुष्य गंडल्याची प्राथमिक लक्षणं कोणती? एक म्हणजे नुसता आयुष्यात नुसता धिंगाणा होणे. सगळं अस्ताव्यस्त , भविष्याचं काय घेऊन बसला वर्तमानाचा सुद्धा भरवसा नसणे.
नुसत्या अडचणी . पण त्या सोडवत जगणं म्हणजे मजाच ना !
ऐन निघायच्या वेळी गाडीची चावी हरवणे , अंघोळीला बसल्यावर साबण संपल्याचे लक्षात येणे, अख्खा साबण लावल्यावर पाणी संपणे, अंघोळ झाल्यावर जी घालायची ती अंडरपॅन्ट गच्च भरलेल्या बादलीत पडून संपूर्ण भिजणे , भरवस्तीत मुलींच्या घोळक्यासमोर गाडी बंद पडणे , लग्नात नाचताना पॅन्ट फाटने , सबमिशनच्या अगदी शेवटच्या क्षणी आपल्याला हाकलून देणे ही गंडल्याची काही लक्षणे !
अशा वेळी आयुष्यावर चिडून काय फायदा ? उलट याचा आनंद घेत जगलं तर ? आयुष्याची मजा खरी असं गंडण्यातच आहे. रस्ता चुकणे ही तर गंडल्याची सर्वात पक्की खुण. हरीचंद्रगडावर एकदा आमची वाट चुकली आणि भली मोठी गुहा बघायला मिळाली . तिथे वाघाच्या अस्तित्वाच्या खुणा बघायला मिळाल्या. त्या वेळी वाटलेली भीती आणि धीरगंभीर शांततेत फुटलेला घाम म्हणजे साक्षात मृत्यूच. तरीही जिवंत मागे आलोच ना ! गंडल्याची ही मजा नाही घेतली तर आयुष्य बिनकामाचे वाटेल.
म्हणजे बघा ना माझ्या गाडीची चावी रोज हरवते. अर्थात याला आमचा निष्काळजीपणा नडतो पण हरवते राव चावी. मग वरच्या मजल्यावर तपासून झाल्यावर मी खाली येतो. ड्रॉवर, माळे, किचन, फ्रीज सगळं चेक करून झाल्यानंतर पुन्हा वरच्या मजल्यावर दोन खोल्या चेक करतो. आणि हे सगळे सुरू असते नऊ वाजता. अर्थात नऊ हा माझा ऑफिसचा टाईम. मग चावी गाडीलाच असल्याचा शोध मला लागतो आणि मी हेल्मेट विसरून ऑफिसला घाई घाईत जातो. पोलिसमामाला चुकवत गल्ली बॉय बनत मी ऑफिसला पोचतो. मग कळतं की डोक्याला तेल लावायचं राहीलं. अर्थात आयुष्य गंडलंय राव!
एकदा तर हद्दच झाली . मी पाईपलाईन रोडवरून पुणे स्टँडला गेलो. रिक्षावाल्याला पैसे द्यायला पाकीट काढलं. कशाचं काय ? पाकिटात फक्त 5 रुपये!!! बापरे! पैसे गेले कुठे? आत्ताच तर काकांनी 200 दिले होते. रडकुंडीला आलेला चेहरा घेऊन मी रिक्षावाल्याला म्हणालो.
"सर, माझ्या पाकिटात पैसेच नाहीयेत ओ..."
तो रागात म्हणाला "चला मी तुम्हाला पुन्हा पाईपलाईनला घेऊन जातो. मग मला पैसे द्या."
मग रडवेला मी आणि तो रिक्षावाला पुन्हा सिट भरत भरत निघालो. दिल्लीगेट पर्यंत रिक्षा आल्यावर माझ्याच पाकिटात मला दोनशे रुपये सापडले!!! म्हणजे माझ्याच पाकिटात असलेले पैसे मला वेळेवर का नाही सापडले ? याचं एकच उत्तर म्हणजे आयुष्य गंडलंय !! या गंडलेल्या आयुष्याच्या रागात पुन्हा दिल्लीगेट ते पुणे स्टँड पर्यंत पायीपायी गेलो. मोक्कार पाय दुखले.
थोडक्यात आयुष्य माझं एकट्याचंच गंडलंय की अजून कोणी आहेत याचा शोध घेतला तेव्हा जवळजवळ बरेच गंडलेले आढळून आले. म्हणजे कोणी इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलं , कोणी बारावीनंतर डिप्लोमा केला आणि तोही मेकॅनिकल , कोणी वावरभर कांदे लावले , कोणी डी एड ला ऍडमिशन घेतलं , असो. प्रत्येक जण गंडतो राव कुठेतरी . पण हे गंडलेलं खुल्या दिलाने स्वीकारून हसत पुढे गेलं तर आयुष्य तुमचं स्वागतच करेन.
आयुष्याशी लपाछपी खेळत गंडत चुकत भरकटत जगण्यात वेगळी मजा आहे. आलेल्या प्रत्येक संकटाकडे बघून फक्त म्हणायचं "च्यायला आयुष्य गंडलंय राव !" आणि बिनधास्त पुढे निघायचं....
- अजिंक्य
Comments
Post a Comment