Skip to main content

गावपण भाग 4 :ताल आणि बांधारी


ताल आणि बांधारी

ताल शब्द नाही पण या शब्दाचा अर्थ हरवतोय . मराठी भाषेत हा शब्द दोन तीन अर्थांनी वापरला जातो . एक ताल संगीतातील आहे . ताल या शब्दाचा दुसरा अर्थ रीत किंवा पद्धत असाही होतो . बेताल म्हणजे ताल नसलेला किंवा अनियंत्रित असा . असो आपण गावपन या सदरात गावामध्ये वापरल्या जाणऱ्या ताल या शब्दविषयी बोलू .

याआधी आपण खिळपाट , आरण ,कालवड असे  मराठी भाषेतून गायब होत चाललेले शब्द समजून घेतले . यातल्या खिळपाटाशी साम्य सांगणारा शब्द आहे ताल . खिळपाट हा शब्द नपुसकलिंगी तर ताल हा शब्द स्त्रीलिंगी आहे . दगडाची ओबडधोबड रचलेली जाड भिंत म्हणजे ताल . ताल ही खिळपाटाच्या तुलनेत छोटी पण रुंद असते . पाण्यामुळे जमिनीची झीज होऊ नये म्हणून घातलेला दगडी बांध म्हणजे ताल . खिळपाटाप्रमाणे ताल देखील माती ,सिमेंट अशा गोष्टींशीवाय बांधलेली असते त्यामुळे इथे सुद्धा कसब लागते .


पूर्वी डोंगरउतारावर शेती केली जायची तेव्हा माती धरून रहावी आणि पाणी अडवून राहावे यासाठी ताल घातली जायची . यामुळे मृदा आणि जलसंधारण व्हायचे . जमिनीला उतार जास्त असेल तर तो कमी करण्यासाठी ताल घातली जाते . तालीची रुंदी साधारण 3 फुटाच्या आसपास असते . खाली ती जास्त रुंद असते आणि वरती निमुळती होत जाते . त्यामुळे माती धरून राहते आणि पाण्याचा निचरा देखील होतो . माती ओली झाल्यानंतर जास्त पाणी साठवून ठेऊ शकत नाही .अशा वेळी बांध वाहून जातात पण जर ताल असेल तर पाणी आपोआप निघून जाते . आजकाल या ताली बघायला मिळत नाही . ताली म्हणजे शेतजमिनीच्या भुवयाच असतात जणू ! आणि जर भुवयाच नसतील तर चेहरा कसा दिसेल जरा कल्पना करा .

गावाकडे बांधारी अशी एक गोष्ट असते . बांधारी हा शब्द बंधारा या शब्दावरून आला आहे . बंधाऱ्याच्या तुलनेत छोटा असलेला बांध म्हणजे बांधारी . शेताच्या बांधाला बांधारी म्हणतात . पूर्वी मोटेचे ( विहिरीतून बैलांच्या साहाय्याने पाणी काढण्याचे जुने तंत्र ) पाणी जाण्यासाठी बांधारीवरून पाट ( पाणी इच्छित स्थळी नेण्यासाठी केलेला मातीचा छोटा कॅनल ) केलेला असायचा . त्यामुळे बांधारी दगडाने भक्कम केलेली असायची . बांधून घेतलेली असायची . कदाचित यामुळेच बांधून घेतलेला बांध म्हणजे बांधारी असा शब्दप्रयोग आला असावा  .

गावाकडे या बांधारीवर हमखास पेरूची किंवा जांभळीची झाडे असतात . सावलीसाठी कडुनिंबाचे झाड देखील असते . पिंपळाचे किंवा वादाचे झाड त्रासदायक ठरते त्यामुळे शक्यतो त्याची वाढ शेतकरी होऊ देत नाहीत . चुकून पिंपळाचे झाड आले तर मग त्या झाडाखाली म्हसोबा किंवा मुंजोबाची प्रतिष्ठापना होते . बांधारी प्रत्येक उन्हाळ्यात साफ करावी लागते नाहीतर पिकांमध्ये उंदराचे प्रमाण वाढते  . बांधारीवर बोराट्यांचे आक्रमण होते . मग रात्रीच्या वेळी शेतात जायची भीती वाटायला लागते .

पहाटेपासून म्हणजे अगदी 3 वाजल्यापासून नांगर हाकल्याच्या आठवणी जुने जाणते सांगतात . तेव्हा सकाळी कारभारीन न्याहारी घेऊन यायची . बांधारीवर सावलीला बसून ती न्याहारी सोडण्यातला आनंद एक आजोबा माझ्यासमोर व्यक्त करत होते . त्यांची कारभारीन त्यांना आणि या जगाला सोडून कधीच गेली होती . गुडग्यावर कांदा फोडून न्याहारीवर ताव मारताना कारभारणीच्या डोळ्यातले समाधान त्यांनी बघितले होते . बांधारीवर वाढलेला पवना (एक गवत ) खाताना बैलांच्या घंटीचा निनाद त्यांनी ऐकला होता . त्या सगळ्या गोष्टी आठवताना आजोबांनी ती बांधारी डोळ्यासमोर उभी केली होती आणि त्यांचेही डोळे पाणावले होते .
एकंदरीत ताल पूर्णपणे दगडी असते तर बांधारी माती आणि दगडात बांधलेली असते . शेताचा बांध किंवा सीमा देखील त्यामुळे स्पष्ट होत . यातूनच पुढे सीमावाद सुरू झाला . शेतीचे जसे तुकडे झाले तसे शेताच्या बांधावरून भांडणे उभी राहिली . न्यायालयात खटले भरले गेले .यातून पुढे बांध कोरणे हा वाक्प्रचार देखील पुढे रूढ झाला ! बांधाला बांध असणे म्हणजे रोजचे संबंध असणे हे देखील त्याचेच अपत्य . बांधारीवर हरळी वाढल्याने मातीची झीज होत नाही हा एक फायदा .
आजकाल जमिनीच्या कमतरतेमुळे बांधाऱ्या  आणि  ताली राहिल्या नाहीत . त्या छोट्या होत गेल्या . त्यावर लिंबाचे आंब्याचे झाड असत नाही . आजच्या पिढीला बांधारीवर बसून खाल्लेले पेरू ,आंबे ,सीताफळ आठवत नाही . बांधारीवर बसून विविधभारती रेडिओ ऐकलेला आठवत नाही . ती प्रेमळ रांगडी संस्कृती खरच हरवते आहे लुप्त होत चाललेल्या तालींबरोबर आणि बांधाऱ्यांबरोबर .....

--ajinkya

Comments

  1. मस्त आहे लेख....👌

    ReplyDelete
  2. छान माहिती अजिंक्य ...शहरातल्या लोकांनी तर हे सौंदर्य पाहिलेलं नाहीच पण ग्रामीण भागात सुद्धा हे लुप्त होत चाललंय ... त्यामुळे सर्वानीच जरूर वाचवा असा लेख....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...