"काय सारखं कानात खुंट्या ठोकून बसलाय ....!!!."हे वाक्य आपल्या सर्वांच्या कानी आलेच असेल . " कानात खुंट्या ठोकून बसने हे तुला अजिबात शोभत नाही , टुकारपणाची लक्षणे आहेत ही "असं कितीही चिडवलं तरी आम्ही मात्र हेडफोन वापरतो . प्रेमात पडलेल्या प्रेमवीरांचे सर्वात मोठे अस्त्र म्हणजे मोबाईल आणि छोटे हत्यार म्हणजे हेडफोन ! गुपचिप खूप वेळ गप्पा मारताना हेडफोन लागतोच ...त्यातून पाठवलेले किसेस , गुलाबी गप्पा , सिक्रेट्स सगळं काही हेडफोनच्या भावविश्वाचा एक भागच . अगदी ब्रम्हानंदी टाळी लागते हेडफोन घातले की !
कानाला लावून बोलायच्या डबड्या फोनपासून कानात घालायच्या ब्लुटूथपर्यंत तंत्रज्ञान उत्क्रांत झाले . एक थेंब पाणी गेले तरी बिघडणाऱ्या यंत्रापासून पाण्यात वापरायच्या यंत्रापर्यंत आपण मजल मारली . आपल्या सुखासाठी मानवाची ही अथक धडपड फार रोमहर्षक आहे . विमानात न मावणाऱ्या कॉम्पुटर पासून ते थेट आपल्या घड्याळात आलेल्या कॉम्प्युटरचा हा प्रवास अलीकडच्या काळात प्रचंड झपाट्याने झाला . या सगळ्यात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये हेडफोनशी प्रत्येकाचे अगदी जिव्हाळ्याचे नाते आहे .
अगदी ब्रेकअप झाल्यावर 'तुझं बिन सुरज मे आग नही रे , तुझं बिन कोयल मे राग नहीं रे ' किंवा ' तू प्यार हैं किसीं और का ...' आणि प्रेम झाल्यावर डीडीएलजे , टू स्टेटस , रांझना , मैं हूं ना अशी चुपके चुपके चोरी चोरी ऐकलेली गाणी प्रत्येकाला आठवत असतात . या सर्व प्रसंगांमध्ये आपल्या सोबत नेहमी असणारा मित्र म्हणजे आपला हेडफोन . घरच्यांसाठी बोळे, ढेप्या ,खुंट्या काहीही असो पण आपल्यासाठी हा जीव की प्राण असतो ! दोस्तीमध्ये मी एक वेळ जीव देईल पण हेडफोन देणार नाही असे लोक आपणही पाहिले असतील !
तसं बघितलं तर हेडफोन ही विकत घेण्याची गोष्टच नाही हे नवे तत्वज्ञान जन्म घेते आहे . आजवर एकही हेडफोन विकत घेतला नाही आणि घेणारही नाही अशी अनेकांची प्रतिज्ञाच ! असो , फुल बेसवर डीजे गाणी ऐकायला प्रत्येकालाच आवडत असते . यावर अगदी नागाच्या पिल्यापासून गडूळाच्या पाण्यापर्यंत आणि धनगरवाड्यात घुसलेल्या देवापासून आगडबम नगाऱ्यापर्यंत सगळी गाणी अगदी जवळची . थ्री इडिटसमधल्या 'बहती हवा सा था वो...' पासून 'मेरे रष्के कमर' पर्यंत सगळी गाणी अगदी तोंडपाठ ! सुखात दुःखात आपल्याला साथ देणारा हेडफोन जवळ नसेल तर साला जिंदगित काय मजा?
मित्राचे हेडफोन ढापुन आणल्यानंतर गाण्याची चव अगदी जुन्या बिअर सारखी लागते . त्यात एक वेगळीच नशा असते . मैत्रीचा गोडवा आणि त्यावर फुकट मिळाल्याच्या आनंदाची झनकेबाज फोडणी म्हणजे काय विचारलं ? भाऊ एक वेळ खायला नसुदे पण मराठी माणसाला कानात हेडफोन आणि भीमराव पांचाळे , सुरेश भट , सुरेश वाडकर हवेच !!!डोळे झाकून ऐकलेला अनुप जलोटा , गुलाम अली , बेगम अख्तर , पंडित जितेंद्र अभिषेकी , भीमसेन जोशी ,किशोरी अमोनकर सारे काही अद्भुत , अवर्णनीय. संगीत नावाची ही बिअर हेडफोन नावाच्या ग्लासने पिली तरच चढते !!!! त्यात शंकर जयकिशनचं संगीत असेल तर झऱ्याशेजारी बसल्याचाच भास होईल !
डोळे मिटून ऐकलेला अदनान सामी , कुमार सानू , मुहम्मद रफी , किशोर कुमार , लता मंगेशकर , श्रेया घोषाल , नेहा कक्कर आणि बेहोष होऊन ऐकलेला सोनू निगम ही सगळी अद्भुत रसायनेच ! मिका सिंग , हनी सिंग पासून जस्टीन बिबर सगळे आपले जवळचेच... हेडफोनच्या नात्यातले ...या रसायनांच्या साथीने आपण आपल्यामध्ये कुठेतरी जिवंत असतो . लॉंग ड्राईव्ह असो किंवा बसचा प्रवास , विमानप्रवास असो किंवा भटकंती ही गाणी आणि कानातले कॉड जान आणतात .प्रसंगांमध्ये रंग भरतात . हेडफोनच्या वायर म्हणजे मोह मोह के धागेच नाही का ?
बीभत्स गाणी आणि कानाला त्रास होईल एवढा आवाज टाळला तर हेडफोनचे व्यसन तुम्हाला खूप काही देऊन जाईल . मोबाईल मधून निघणाऱ्या हानिकारक किरणांना देखील आपण हेडफोन वापरून टाळू शकतो .
मोबाईल शरीरापासून एक फूट दूर ठेवावा अशी सूचना मोबाईलच्या बरोबर आलेल्या पुस्तकात असते त्यामुळे हेडफोन वापरण्याची सवय चांगली आहे .
उच्च प्रतीच्या ब्रँडेड हेडफोनमुळे आपले कुठलेही नुकसान होत नाही .कधी कधी मोठ्या ऑफिसेस मध्ये फुल एसी सुरू असेल आणि तुम्हाला थंडी वाजत असेल तर चुपचाप आपले हेडफोन काढा आणि कानात घाला . थंडी कमी होईल !
कोणाशी बोलायचे नसेल तर हेडफोन घाला आणि बिनदास्त मोठ्या आवाजात गाणी लावा , त्या व्यक्तीपासून आपली सुटका होईल .
हेडफोन घातल्यावर आपल्याला काही आवाज येत नाही अशी अभिनय करा . शेजारचा बिनदास्त काही सिक्रेट गोष्टी बोलत असेल तर आपण त्या ऐकू शकतो .
रोज कमी आवाजात आपण आवडती गाणी ऐकली तर मानसिक समाधान मिळते आणि एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते . या म्युझिक थेरपीपासून आपण अनेक मानसिक विकारांना दूर सारू शकतो .
प्रवासामध्ये आपण काही महत्वाची भाषणे , बातम्या , व्हिडीओ कुणालाही डिस्टर्ब न करता ऐकू शकतो . त्यामुळे आपल्याला अपडेट राहण्याची सवय लागते .
हेडफोन आणि कानाच्या पडद्यामधून आपण पित असतो सलाईन ....आतून थंड करणारे ,समृद्ध करणारे , गुलाबी थंडीत गारठवणारे , प्रेरणा देणारे , आम्हाला आतून सुंदर बनवत जाणारे . हे सलाईन आहे समाधी अवस्थेचे सुख देणारे ,आयुष्य समृद्ध करणारे , जिवंतपणे स्वर्ग दाखवणारे !!!
-अजिंक्य
Photo by avinash jadhav
Likeme.comment me. Share me.
ऊत्तम...मोह मोह के धागे वाला कन्सेप्ट तर भन्नाटच...
ReplyDeleteKya demag lagaya hai man aye bhai salam hai aapko mera
ReplyDelete😁😁😁😁😚😚😙😍😘
ReplyDeleteApratim likhan bhau...Tuzya creativity la salam. ..Salam music therapy la...
ReplyDelete