पागल....
आकाशाखाली उभे राहिले की आकाशाखालच्या आठवणी आठवतात .त्या कधी रम्य असतात तर कधी रोमांचकारी. कधी भावनातिरेकाने व्याकूळ झालेल्या असतात तर कधी आनंदाने उन्मत्त !पण आठवणी या भूतकाळ सुद्धा जगायला देणारी जादू असतात !भूतकाळ हा आपल्या हातून निसटलेला काळ ही व्याख्या मला पटत नाही . भूतकाळ हा न जगलेला काळ असतो. त्या काळातील एकही क्षण आपल्याला आठवत नाही तो काळ म्हणजे भूतकाळ . येथे प्रश्न असा उपस्थित होतो की भविष्यकाळ सुद्धा आपण जगत नाही मग फक्त भूतकाळच न जगलेला काळ कसा? हा खूप बालिश प्रश्न होता. तर भूतकाळातला एखादा क्षण आपल्याला आठवत नसेल तर त्या काळापुरता आपल्या अस्तित्वाला काहीच अर्थ नव्हता हे मात्र नक्की! खरं सांगायचं झालं तर येणाऱ्या प्रत्येक क्षणाला ,वेळेला ,प्रसंगाला ,संकटाला ,अडथळ्याला, दुःखाला आणि आनंदाला सुद्धा आपण कसे सामोरे जातो, त्या त्या वेळी आपण कसे सादर होतो ? हे महत्त्वाचे . प्रत्येक घटिका आठवण बनून राहिली तर आयुष्य किती सुंदर बनेल नाही ?
आयुष्य अनेकदा वळणं घेत असतं. संथ तर कधी वेगात पुढे जात असतं . काहीवेळा एखाद्या वळणावर कोणी भेटतं किंवा कोणी भेटल्यावर नवं वळण सुरू होतं. माझं आयुष्य सुद्धा अगदी असच आहे . वळणावळणाचं, तिरपं ,कधी सरळ सुद्धा पण जे आहे ते खूप स्वैर आहे ,स्वच्छंद आहे आणि आझादसुद्धा !
जेव्हा आपण स्वतःसाठी जगत असतो तेव्हा दुसऱ्यांच्या आपल्याबद्दलच्या भावनांचा विचार करत नसतो. जेव्हा या अवस्थेला आपण पोहोचतो तेव्हा ती एक अनामिक अध्यात्मिक अवस्था असते . मानवी मन हे भावनांचं मायाजाल आहे. जीवन खरं तर भावनांचा परिपाक आहे . एका क्षणात कोणी आपलं आहे ही भावना निर्माण होते कुठलाही संबंध नसताना. खरंतर निर्मात्याची सर्वात मोठी देणगी आहे 'भावना'! जीवनाला अर्थ प्रदान करणारे एक सामर्थ्य आहे भावना! तोडणारी आणि जोडणारी जादू आहे भावना!
एवढ्यात एक मुलगी मला जवळची वाटायला लागली .ओळखीची वाटायला लागली .तिचे डोळे साफ बोलायचे, एवढीच तिची अदा ! माझ्या आयुष्याच्या सरळ पायवाटेवर तिचं येणं किंवा माझ्याकडून तिला आणणं हे खूप आल्हाददायक होतं . पहाटेच्या शांत आणि थंडगार धुक्यात बैलगाडीतून प्रवास करावा तसं !!!
तिने मला वेडं केलं असं मी म्हणणार नाही कारण मी आधीपासूनच वेडा होतो. फक्त तिने मला वेडा म्हणायला सुरु केल्यावर मी वेडा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालं होतं. ती मला पागल म्हणायची याचं मला कधी आश्चर्य वाटलं नाही .
मी सुद्धा मान्य केलं होतं माझं पागलपण . तिच्याशी आयुष्य भेटलं तसं अधिकच बहरून आलं . मोराच्या पिसाचे रंग आता सहज बघायला मिळायचे . डोळे बरच काही बोलत होते. आता आता ते वेगळच काही बोलायला लागले . मला ते सारे काही नवीन होतं. मला ते वाचता येत नसायचं . सारं काही अपरिचित असतं तेव्हा नजर भिरभिरतेच ! तिचा दोष नसतो तेव्हा! आता ते क्षण पुन्हा आठवले की मी तिच्याशी बोलत राहतो. तिचा माझा मुक्त संवाद सतत अविरत सुरू असतो . मागच्या बाकावर बसून तिच्या आठवणीमध्ये दंग होऊन ! हा नवा परिपाठ बनला होता . आजही असं झालं आणि मी बोलू लागलो.
- अजिंक्य
Photo by avinash jadhav.
Nice
ReplyDeleteSundar lihilay
ReplyDelete