Skip to main content

अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको संघटना  !!

 
अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको या संघटनेचे प्रतिनिधित्व करू शकतो एवढा मी इंजेक्शनला भितो . झालं असं कि मी सातवीत असताना गुढग्यावर बेंड आलं . आता त्याला गावाकडे फिस्कं असं म्हणतात.  जवळजवळ तीन महिने म्हणजे दिवाळी पासून ते थेट मकरसंक्रांतीपर्यंत ते बरं झालं नाही . मी आपलं रोज ते बेंड तसंच वागवायचं . दवाखान्याचं  नाव जरी कोणी काढलं तरी मी त्या व्यक्तीपासून घाबरून राहायचो. मला कोणीही दवाखान्यात नेऊ शकलं नाही , तीन महिने हे शीतयुद्ध सुरु होतं . गावात एखादा सोडलेला बैल असतो किंवा सोडलेली गाय असते ती कधीच कुणाच्या हाती लागत नाही तास मी अगदी जपून रहायचो . गावात बजरंग करंजुलेचा छोटा दवाखाना होता पण मी तिकडं कधीच गेलो नव्हतो . त्याआधी मी कधीच इंजेक्शन घेतलेलं नव्हतं . लोक हातात इंजेक्शन घेतात म्हणजे दंडात हे मला माहित होतं त्यासाठी मी १०-२० टक्के तयार होतो , तसा ऑप्शन मला घरचे द्यायचे पण मी त्यांच्यावर विश्वास ठेऊ शकत नव्हतो . मला माहित होतं कि हे लोक मला नेणार आणि मागून सुई घालणार !!



हे सुई प्रकरण दिवसभर माझ्या डोक्यात असायचं . त्यात मी पाठीवर पिशवी घेऊन सायकलवर शाळेत जायचो . त्यात पॅडल मारताना अक्षरशः माझा गुडगा वाकत नव्हता . गुडग्यावरचं बेंड आता मोक्कार मोठं झालं होतं . वरती भली मोठी तेव्हाच्या दोन रुपयाएवढी खपली आणि त्याखाली पिवळा पु झालेला!! अगदी गच्च भरलेली ती जखम . एवढी जबर दुखायची कि तेवढ्या वेदना मी आजवर कधीही सहन केल्या नाहीत . तरीही एक इंजेक्शन मी कधीही घेतलं नाही . ती जखम आणि त्यामुळे बारीक कणकण आलेली . रोज आपलं लंघडत लंघडत चालायचं , त्या दुखाला पाणी लागू न देता अंघोळ करायची आणि थंडी असल्यामुळे सकाळ सकाळी चुलीसमोर बसून शेकत बसायचं . मग भाकरी खाता खाता त्यावरची पट्टी बळ बळं सोडायची . झालेल्या पुमुळं आणि रक्तामुळे ती वरची धोतराची पट्टी त्याला चिकटायची . ती ओढून काढायची म्हणजे मरणप्राय वेदना व्हायच्या . तरीही इंजेक्षनपुढे सगळ्या वेदना फिक्क्याच !! 

अख्खा गुडगा आता सडणार कि काय अशी भीत वाटायला लागली . बाबा शाळेसमोर येऊन मला पकडायचा प्रयत्न करायचे आपण मी बरोबर चुकवून थेट मळ्यात यायचो. सायकल लावून भटकायचो रानात . अगदी अंधार पडला कि करंजुले डॉक्टरचा दवाखाना बंद होतो हे मी आधीच पाहून ठेवलं होतं . मग हा दवाखाना बंद होईपर्यंत मी असाच रानात भटकायचो. आई रानात घास कापत असायची संध्याकाळच्या वेळी . मग तिच्या पदराशी खेळायचं , थोडीफार मदत करायची आणि मग अंधार पडला कि घरी यायचं आणि मग कोणी मला दवाखान्यात नेत नव्हतं . असे तीन महिने काढले मी ! 

मला पकडून कोणीही दवाखान्यात नेउ शकलं नव्हतं . माझे नगरचे काका आले होते त्यांनी लै समजावून सांगितलं पण काही जमलं नाही . 

शेवटी एक दिवस ठरला त्या दिवशी मला शाळा सुटल्यानंतर गावातल्या घरी बोलावण्यात आलं . काहीतरी कार्यक्रम होता घरी त्यामुळे मी पुरणपोळ्या खाल्ल्या आणि मला तिथूनच उचलून नेण्याचा प्लॅन झाला होता . पुराणपोळीमुळे भवरा इथे फसला आणि चला घरी असं म्हणून एम ८० वरून मी  निघालो रानाकडे . पण आळीमध्ये गाडी थांबवली बाबांनी आणि भगताचा भानाप्पा मागे बसला . तेव्हाच मी ओळखून घेतलं कि आता आपला कार्यक्रम होणार!!  मी जे धिंगाणा चालू केला काय सांगता . पण भानाप्पा लै ताकदीचा गडी होता . मिलिटरी भरतीचा सराव करत असल्यामुळे चांगला निबर गडी आणि त्यात मी जखमी शेर!! आखिर शेर लाथा मारत बुक्क्या मारत नेला थेट करंजुले डॉक्टरकडे आणि डॉक्टरने देखिल घाई घाई सुई काढली आणि माझ्या मागून घातली . मी मोठ्याने ओरडत होतो . लाथा मारत होतो पण काही उपेग झाला नाही . डॉक्टर , भानाप्पा आणि बाबांनी भरपूर लाथा खाल्ल्या पण मला इंजेक्शन टोचलंच आणि त्यानंतर ते दुखणं बरं झालं . आजही गुढग्यावर भाला मोठा काळ डाग तसाच आहे . त्या काळाची एक आठवण . 

त्यांनतर बऱ्याचदा आजारी पडलो पण मी कधी मागून इंजेक्शन घेतलं नाही . गोळ्यांवरच काम भागवलं. एकदा सलाईन लावायची वेळ आली होती पण मागून सुई घालायची वेळ आली नाही त्यानंतर !! हे सुई पराक्रम आयुष्यभर आपला पिच्छा करत असतं सालं ! आयुष्यात पहिल्यांदा रक्तदान केलं तेव्हा तर बाप्पा गुरासारखं टोचलं रे मला ! समोर क्रश बसलेलं आणि मी मोठ्या ऐटीत गेलो ना रक्तदानाला . लै टोचलं रे आणि रक्तदान केल्यावर उठताच येईना भाऊंना २ तास !! त्यांनतर व्हल्गडत व्हल्गडत घरी आलो.  तेव्हापासून मी अखिल भारतीय तलवार घाला पण इंजेक्शन नको या संघटनेत सक्रिय झालो !

- ajinkya dandawate 

Comments

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 12 : जवारी आळाशे पाचूंदा वळ्हई आणि बरंच काही ...

आज आपण बघणार आहोत काही असेच शब्द . सुरुवात करूया ज्वारीच्या ताटापासून . ज्वारीचे ताट म्हणजे ज्वारीचं एक रोप . बाजरीच्या एका बुडखातून चार पाच ताटं फुटतात आणि त्यामुळे कणसं देखील चार पाच येतात . ज्वारीचं तसं नाही . तशी ज्वारी ही पावसाच्या पाण्यावर येते पण सध्या पाणी द्यावं लागतं . नुकतेच उगवलेले ज्वारीचे कोंब आणि त्याची हिरवी लुसलुशीत पाने उंदराच्या कानासारखी दिसतात हे नमूद करायला हवे . जर पाण्याअभावी किंवा खताअभावी ज्वारी वाढली नाही तर त्याला 'बाटूक' म्हणतात .आम्ही कमी उंचीच्या अशक्त मुलामुलींना बाटूक म्हणून चिडवतो ही आमची खासियत . असो जेव्हा कणसाचे दाणे दिसू लागतात तेव्हा ज्वारी निसवली असे म्हणतात . निसवली म्हणजे निबर झाली . पाखरे ज्वारीवर आक्रमण करतात तो हाच काळ . यावेळी गोफण (एक हत्यार ) फिरवून , फटाके वाजवून , बुजगावणे उभारून पाखरांना हाकलून राखण करावी लागते . राखण करण्यासाठी आणि उंचावर उभा राहण्यासाठी चार खांबांचा आधार देऊन एक 'मचाण' उभारलं जातं . त्यावर उभं राहून गोफण फिरवणे सोप्पे जाते . एक काळ असा असतो जेव्हा ज्वारी पूर्ण पक्व नसते आणि कच्ची देखील नस...