Skip to main content

करोना, law of survival of fittest आणि वर्गसंघर्ष

कोरोनाच्या निमित्ताने देशभर एक मोठं संकट घोंगावत असताना फार वेळ मिळाला आहे प्रत्येकाला आत्मशोध घेण्यासाठी. अर्थात किती जण हा वेळ आत्मशोधासाठी वापरताहेत हा शोधाचाच विषय. असो. मुळात हे संकट भारत देश अशिक्षित, अडाणी, अंधश्रद्धा युक्त, गरीब आणि भयानक आर्थिक विषमता असलेला आहे. त्यामुळे या सगळ्यांचा एकत्रितपणे परिणाम या संकटाची दाहकता वाढवतो.

सगळीकडे कर्फ्यु असताना सायकलवर गावाकडे परत चाललेलं एक तरुण मजूर जोडपं एका वृत्तवाहिणीवर दिसलं. त्यात त्यांची एक मुलगी त्या स्त्रीकडे मागे कडेवर होती आणि एक बाळ पुढे सायकलच्या नळीवर बसलेलं. झोपी गेलेल्या त्या बाळाने आपलं मुंडकं हँडलवर टेकवलं होतं. त्याला हादरे बसू नये म्हणून, खड्ड्यामुळे आदळू नये म्हणून त्याचा बाप त्या डोक्याखाली हँडलवर केवळ एक टॉवेलची घडी ठेऊ शकत होता. त्याकडे हजार अकराशे किलोमीटर सायकलवर प्रवास करण्याखेरीज दुसरा उपाय नव्हता. माणसाने स्वतःच्या सुखासाठी सुरू केलेला खेळ आता असा माणसाच्या जीवावर बेततो आहे. यंत्र बनून स्पर्धेत फिरण्याशिवाय आता दुसरा मार्ग उरलेला नाही.


गेलं एक वर्ष भारतावर आणि काही अंशी जगावर आर्थिक मंदीचं सावट आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रात प्रचंड मंदी आली आहे असे जो तो म्हणतो. भारतात या मंदीची सुरुवात नोटबंदी आणि जीएसटीमध्ये दडलेली आहेत अशी टीका सातत्याने होत आहे . रुपया , डॉलर, तेलाचे भाव, आयात, निर्यात, परकीय चलन, वित्तीय तूट, अर्थसंकल्प या सगळ्या बाबी आता माणसाशी प्रचंड निगडी झाल्या आहेत.

मानवी उत्क्रांतीचा इतिहास पहिला तर अर्थव्यवस्था, शिक्षण, आरक्षण, सुरक्षा, देश, आरोग्य, स्पर्धा, युद्ध, धर्म, राजकारण हे सगळे नसते उपद्व्याप आहेत. माणसाने हे नसते उपद्व्याप अगदी सुखाच्या हव्यासापोटी केले. त्यातून आता स्वतःच्या सुखासाठी सुरू केलेला हा उपद्व्याप त्याच्याच बोकांडी बसायला लागला आहे.

जुन्या मळणी यंत्राचं डिझेल इंजिनाचा हँडल मारून त्याला वेग द्यावा लागायचा, पुरेसा वेग पकडला की गिअर टाकून इंजिन चालू केलं जायचं. (त्या गिअर ला इकडे घोडा म्हणतात) पण व्हायचं असं की योग्य गती देईपर्यंत हँडल फिरवावा लागायचा आणि गिअर टाकल्यानंतर जर हँडल काढला नाही तर माणूस उचलून फेकून देईल एवढा वेग ते इंजिन घ्यायचं. नाहीतर हँडल भला जोरात उंच उडून जायचा. कित्येकांनी यात मोठ्या दुखापती करून घेतल्यात. तर असो, सांगायचा मुद्दा असा की सुखाच्या हव्यासाने माणसाने हा सगळा खेळ मांडला. वास्तुविनिमय, त्यानंतर नाणे, नोटा करून व्यापार उभा केला. कारखाने उभारले. निसर्गावर आपण किती वेळा, कसा बलात्कार करतोय याचे भान राहिले नाही. आता मात्र इंजिनाचा हँडल उडून कधी डोक्यात बसेल सांगता येत नाही!

प्रचंड भयानक जीवघेणी स्पर्धा सुरू झाली. अगदी दिसण्यापासून असण्यापर्यंत प्रत्येक गोष्टींचं मार्केटिंग झालं. प्रत्येक माणसाला एक विशिष्ट नंबर मिळाला आणि बाजारात विशिष्ट किंमत मिळाली. ही किंमत वाढली पाहिजे असा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष दबाव तयार झाला. या स्पर्धेतून आर्थिक सामाजिक विषमता वाढली आणि वर्गसंघर्ष सुरू झाला. माणसांमधील भावनिकता संपली, मायेचा ओलावा संपला, भावना देखील या पैशाने यांत्रिक केल्या.

आता मुळात कोरोनाच्या अनुषंगाने बोलायला सुरुवात केली आणि हे काय बोलतोय असं तुम्ही म्हणाल पण ही पार्श्वभूमी आहे या पाठीमागची. या सगळ्यामुळे परिपूर्ण माणसाची व्याख्या बदलली. पूर्वी एखादा माणूस उत्तम शेती करू शकत असेल, स्वतः प्राणी आणि इतर माणसांपासून संरक्षण करू शकत असेल, स्वतःचं पोट भरू शकत असेल तर तो परिपूर्ण होता. आयुष्य कष्टप्रद जरी असले तरी परिपूर्ण होते.

त्यानंतर आजच्या युगात अगदी स्वयंपाक करण्यापासून कपडे धुण्यापर्यंत आणि प्रवास करण्यापासून संरक्षणापर्यंत प्रत्येक गोष्टीवर माणूस दुसऱ्या कोणावर तरी किंवा कोणत्यातरी वस्तूवर अवलंबून आहे. खरं पाहायला गेलं तर पूर्वीचा माणूस स्वावलंबी होता. माणूस म्हणून तो फिटेस्ट होता पण आज या इंजिनाच्या वेगापुढे फिटेस्ट असण्याचा क्रायटेरिया बदलला आहे. पैसा हे फिटेस्ट असण्याचं लक्षण बनलं आहे.
हे सगळं संपूर्ण मानवजातीच्या बोकांडी बसतं आहे पण हे काळाचं इंजिन उलटं कधीच फिरवता येत नाही. ते थांबवता जरूर येऊ शकतं. कोरोनासारखी संकटं आली की थांबल्यासारखं वाटतं. पुन्हा शेती करणाऱ्या, अतिशय सावध शिकार करणाऱ्या, स्वतः अन्न शिजवू, मिळवू , तयार करू शकणाऱ्या, स्वतः स्वतःचं संरक्षण करू शकणाऱ्या माणसाला फिटेस्ट झाल्यासारखं वाटतं. ही मोठी गोष्ट वाटते.

सेपिअन्स पुस्तक वाचताना आयुष्य किती फडतूस आहे हे ठायीठायी जाणवते. निरर्थक, निराश, बेजान, बेरंग आयुष्याला नवे मुलामे चढवण्यात गुंग असलेल्या अक्कलशुन्य पिढीकडे बघून हसू येतं. या स्पर्धेत सामील होऊन स्वतःचं फिटेस्टपण सोडून इतरांवर अवलंबून राहणं ही घोडचूकच आहे. अशा रोगांच्या, लॉकडाऊनच्या काळात जाणवतं. फिटेस्ट असण्याचा जुना क्रायटेरिया बेस्ट आहे. अचल आहे. अविनाशी आहे. शेतकरी शेती करून खात आहे, भटक्या जमतीतले लोक दिवसभर डुकरं, ससे, मासे पकडून खात आहेत. अत्यंत पौष्टिक. गावाकडे राहणारे लोक पुन्हा गावच्या छोट्या अर्थव्यवस्थेत जाताहेत आणि विनिमय करत आहेत. व्यवसाय जरी बंद पडले तरी कित्येक वर्षे ते जगू शकताहेत.

राहिली गोष्ट कोरोनाची. तर कोरोना चीनने तयार केला, किंवा त्यांच्या आहारामुळे तयार झाला किंवा इतर बावळट संकल्पना बाजूला ठेवल्या तरी दुसऱ्या देशात गेलेल्या मोठ्या इन करून राहणाऱ्या, परकीय चलनात जास्त पैसा कमावणाऱ्या उच्च लोकांनी भारतात आणला असा इकडे समज आहे. ही माणसं देखील देशाच्या एकूण विकासात आपलं योगदान देत असतात तरीही सात आठ तास काम करून लाखो रुपये कमावणारे लोक आणि दिवसरात्र काम करून महिन्याचा घरखर्च भागत नाही असे लोक यांच्यात संघर्ष अटळ आहे. हा वर्गसंघर्ष नेहमी डोकं वर काढत राहणारच आहे. नोटबंदीच्या काळात देखील लोक या एकाच गोष्टीवर रांगेत उभे राहण्यासाठी तयार होते. कारण यामध्ये उच्चभ्रू लोकांना कायदा पकडेल अशी भाबडी आशा होती. असो तर कोरोनामुळे उच्चभ्रू आणि गरीब अशी दरी गावाकडे पाहायला मिळत आहे. किंवा दुसऱ्या देशात जाऊन करोना घेऊन आलेल्यांबद्दल पण राग आहे.

हा वर्गसंघर्ष टिपेला पोचणार असतो. ही व्यवस्था उलथावणार असतो. हा नियम आहे.पण पुन्हा नवी व्यवस्था देखील नवे नियम घालून हेच लोक तयार करणार. पुन्हा वर्गसंघर्ष होत राहणार हेही नक्की. भारतासारख्या देशात धर्म, जाती, संप्रदाय या संघर्षाने या इतिहासात अजूनच मीठ मसाला पडतो. भावनाविरहित व्यवस्था लोकांचं भावनिक ब्रेनवॉशिंग करून आपलं काम साध्य करत असते. भावनेला साद घालणं हेच तर व्यवस्थेचं आणि पर्यायाने नेतृत्व करणाऱ्या माणसांच्या फिटेस्टपणाचं नवं लक्षण आहे.

कोरोनाच्या निमित्ताने घरी लोकडाऊन करून घेणे हे देशकार्य असल्याचं बिंबवलं गेलं. लोकांना असं बसल्या बसल्या सोप्प्या पद्धतीने देशकार्य करण्याची संधी फार आवडत असते. ते ही संधी थेट डोक्यावर उचलतात आणि आनंद साजरा करतात. देशसेवेसारखा आनंद नाहीतरी कशात आहे!

अरे पण दोन दिवस उपाशी राहिलेल्या एका वर्गाचं काय? पोटात अन्न नसेल, निवारा नसेल तर देशसेवेचा डोस किती पुरणार. जेव्हा हे लोंढे बाहेर पडले तेव्हा व्यवस्थेचं पितळ उघडं पडलं. आणि हे लोंढे नुसते बाहेर पडले नाहीत तर त्यांनी आपापल्या घराकडे पावलं टाकली. गरोदर स्त्रिया, छोटी बाळं, मुली, म्हातारे सगळे घरी निघाले. देशभरातून पुन्हा व्यावस्थेचं रक्त पिलेल्या लोकांनी त्या रक्ताच्या अनुषंगाने टीका सुरू केली.

हा रोग जर संपर्कातून पसरत नसता तर व्यवस्थेने या गरीब मजुरांना 500 किलोमीटरवर पायी जाऊ दिलं असतं.  यांच्यामुळे देशभर कोरोना पसरू शकतो ही फार जमेची बाजू या मजुरांकडे आहे. त्यामुळे त्यांना व्यवस्थित बसेस, जेवण, सुविधा करण्यात आली. त्यांना आरोग्य सुविधा देखील मिळतील. हे मजूर आणि कामगारवर्गच व्यवस्थेचा कणा आहे ही जाणीव व्यवस्थेला असते पण ही जाणीव त्या मजुरांना कामगारांना होऊ दिली जात नाही हा डाव असतो.

जगात अजून अनेक लोक दोन वेळच्या जेवणासाठी महाग आहेत. ही वास्तविकता आहे. दहा बाय दहाच्या खोलीत कोणी अख्खं आयुष्य काढत आहे आणि दुसऱ्या बाजूला कोणी एखादं संपूर्ण बेट विकत घेऊन तिकडे कामगार ठेऊन ऐश करत आहे. ही दरी फार मोठी आहे. हा वर्गसंघर्ष भयानक आहे.

पुणे मुंबई, दिल्लीसारख्या शहरांतून या बाहेर निघालेल्या लोकांना मदत केली जाईल असं जरी सरकार म्हणत असलं तरी त्यांना बाहेर निघावं लागलं तेव्हा सरकार किंवा व्यवस्थेला जाण आली ही वास्तविकता आहे. लॉकडाऊनची घोषणा करण्याआधी सरकारकडे ही आकडेवारी असायला नको का? नियोजन करताना खालच्या लोकांची फक्त नावं घेतली जातात. त्यांच्यावर होणाऱ्या परिणामांचा विचार होत नाही का? सरकार मदतीच्या घोषणा करू शकतं मग आरोग्य सुविधा का उभारू शकत नाही? असे हजारो प्रश्न उभे राहतात.

गावाकडे करोना येत नसतो. आपण निवांत खायचं आणि निवांत राहायचं अशी एक मानसिकता आहे. लोक निवांत शेती करत आहेत. त्यांचा व्यापार जरी खुंटला असला तरी अगदीच भाजी खरेदी करावी लागेल आणि त्याशिवाय आज जेवण नाही अशी परिस्थिती नाही. श्रीमंत, उच्चभ्रू, पैशेवाल्या आणि व्यवस्थेच्याही उरावर बसून खालच्या उतरंडीकडे पाहून हसणार्या लोकांना आता हे लोक वाकुल्या दाखवू लागले आहेत. करोनाने तशी संधी खालच्या लोकांना दिली आहे. अशा आशयाच्या पौष्टी देखील मीडियात फिरत आहेत.

 -अजिंक्य

Comments

  1. 👌👌 वास्तविकतेच दर्शन घडविणारा लेख आहे 👍👍

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...