वेळ दुपारी एकची. निघालो पायीपायी थेट नगर कॉलेजवरून शक्कर चौकापर्यंत . कोणालाही लिफ्ट मागून , रिक्षा करून मी माझा आत्मिक पराभव करून घेतला नाही . अर्थातच नशीब चांगले म्हणून एक 709 टेम्पो थांबला आणि माझा शिरूरकडे प्रवास सुरु झाला .709 विषयी माझी एक विशेष आठवण आहे त्यावर नंतर बोलू . निवांत झोप लागली . थेट शिरूरच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला उतरलो . तिथून एक मित्राने मला जोशीवाडीच्या स्टेट बँकेत सोडले आणि इथून माझे नशीब पलटले . अहो पालटले कशाचे चांगले कोलमडले , धडपडले . चांगलं खरचटलं असणार त्याला .!
बँकेत प्रविष्ट झालो .गेल्यागेल्या 6 नंबरच्या कर्मचारी महाशयाला विचारले , "आधार लिंकचा पुरावा हवा आहे." त्याने फॉर्म घेतला . नंबर टाकून पहिला आणि महाशय वदले की "आधार लिंक केलेले नाही.तुम्ही लिंक करून घ्या "
मी लगेच आधार आणि पण कार्डच्या झेरॉक्स जोडून दणदणीत सह्या ठोकल्या . तोपर्यंत गोंडस दिसणाऱ्या त्या गृहस्थापूढे दोन चार कागद येऊन पडले .
मी त्याच्या पुढच्या डेक्सवर फॉर्म घेऊन उभा राहिलो . नंतर बसलो . सुमारे 20 मिनिटांच्या अवधीनंतर त्या महाशयांनी मला सांगितले की " आधार लिंकिंग शेजारच्या तीन नंबरच्या खिडकीत करा " माझ्या 20 मिनिटांची स्टेट बँकेच्या त्या ढब्बू शेंगदाण्याला काहीच किंमत नव्हती .
डोक्यात एक क्षणभर धीरगंभीर वीज कडाडली . तळपायाची आग मस्तकात जायच्या आत तिथेच पेट घेऊ लागली . आता तुम्ही विचार करत असाल की मी त्याला सात्विक शिव्या शाप दिले असतील . भांडण झाले असेल . पण काही नाही .
मी शांतपणे तीन नंबरच्या गुटगुटीत गृहस्थांकडे माझा फॉर्म दिला . गदगदल्या अंतःकरणाने किती दिवस लागेल असे विचारले . त्याने 10 ते 12 दिवसांचे वचन अगदी प्रेमाने मला दिले आणि असे हे स्टेट बँकेशी असलेले माझे अफेअर सुरू आहे . कधी कधी वाटते की ज्या वेळेस आल्या आल्या स्टेट बँकेत माझे काम सरळ सरळ पूर्ण होईल , त्या दिवशी डोळ्यातून विजयाचे आनंदाश्रू वाहू लागतील . त्या दिवशी मी हातानी गोडधोड करून खाईल .
तर स्टेट बँकेत गेल्यानंतर आपले आयुष्य आता संपूर्ण गंडले आहे असा विश्वास वाटतो . एकदा तिथल्या बाईला मी माझे आडनाव 'गंडले' करायचे आहे असे सांगून फॉर्म आणला होता .असो स्टेट बँकेइतक्या शिव्या मी आयुष्यात कधीच कोणाला दिल्या नसतील . तसा मी सात्विक माणूस आहे पण स्टेट बँकेच्या बाबतीत शिव्या द्यायला मी मागेपुढे पाहत नाही. या बँकेचे तिच्या ग्राहकांशी असलेले सगळे छोटेमोठे संबंध मला अनैतिक वाटतात .
हे स्टेट बँकेचे गचाळ पुराण उदाहरणार्थ फारच झाले .पण काय करणार हो . स्टेट बँक असं कोणी म्हटलं तरी माझा दिवस खराब जातो . तिथून बसलो एका क्रूझर नावाच्या फोर्स कंपनीच्या लांबलचक गाडीत . त्याला जीबडं म्हणतात . शिरूरहून आमच्या दैठण्याला यायचं म्हटलं की तीन पर्याय असतात . तीनही तितकेच अवघड . एकमेकांचे तुल्यबळ प्रतिस्पर्धी ! एक म्हणजे यष्टी , दुसरं ते टमटम आणि तिसरं जीबडं !
यष्टी ही बहुश्रुत , बहुचर्चित प्रख्यात प्रकार असल्याने त्यावर मी माझा वेळ खर्च करत नाही . बँकेने खाल्लेले 20 मिनिटे मला भरून काढायचे आहेत .
पूर्वी काळी पिवळी फोर्स कंपनीची टमटम हे प्रमुख वाहन होते . दे धक्का नावाच्या फालतू मराठी सिनेमात आपण बघतो ती टमटम . कायम उघडीनागडी पण भक्कम . बसणाऱ्यांच्या कसाबानुसार तिची क्यापॅसीटी ! जशी फटफट करणारी फटफटी तशी ही टमटम करणारी टमटम ! बरीच वर्षे या टमटमींनी शिरूर ते दैठण असा प्रवास करून लै उपकार केले . आता सुद्धा टमटमी शिल्लक आहेत पण कमी .
त्या टमटम ला टाटांच्या छोटा हत्ती नावाच्या छोट्या पांढऱ्या वाहनाने टक्कर दिली . या छोटा हत्तीचे नाव एसी मॅजिक असे आहे पण कोण म्हणत नाही . जुने लोक याला पण टमटम म्हणतात .
तिसरा पर्याय म्हणजे मी आज ज्यानी आलो ते जीबडं . पूर्वी कमांडर जीप असायची . तिच्या आवजातच रग होती . पोलिसांकडे बहुदा आपण तिला पहिली आहे . ही कमांडर खाचखळगे , चढ उतार , घाट ,खड्डे काही बघायची नाही . प्रवाश्यांची मनोभावे सेवा करणारी कमांडर आणि तिचा दमदार आवाज मला आवडतो . त्या कमांडरवर पायरीवर उभा राहून टपाडाला पकडून केलेला एसी प्रवास हा अनुभव नक्की घ्या .पुढे कमांडर ची जागा क्रूझर नावाच्या राक्षसी ताकद असलेल्या फोर्स कंपनीच्या गाडीने घेतली . या गाडीत 20 लोक आरामात बसतात . मला ही गाडी आरामदायी वाटत नाही . मी बसलो . आल्हाद दार लावले .
दरवाजा व्यवस्थित लागलेला असताना देखील समोर बसलेल्या सद्गृहस्थ माणसाने तो पुन्हा उघडून प्रचंड जोरात लावला . यष्टीचा , कारचा दरवाजा जोरात लावल्याशिवाय समाधान होत नाही आता एक प्रसिद्ध वर्ग समाजात आहे . आपण कितीही प्रयत्न केला तरी अशी वर्गवारी थांबवू शकत नाही . मी तसा प्रचंड स्थितप्रज्ञ असल्याने मला तिथे अपमान , राग असे काही आले नाही . दरवाजा लावल्यावर उडालेली धूळ शांत झाली . सगळे सेट झाले . एव्हाना गाडी जोशीवाडीवर आली असेल . तेव्हा मला गाडीतल्या स्पीकरची जाणीव झाली . दर्दभरे नगमे गाडीत जळत होतेच .
तू प्यार किसींसे न कर
किसींसे तू दिल न लगा
कही टूट नही जाए
मेरिहि तरह दिल तेरा
या त्या सुमधुर ओळी . आधीच स्टेट बँकेने प्यार , मोहब्बत , विश्वास , वादा अशा अनेक गोष्टींची आई बहीण एक केलेली .त्यात इतके मार्गदर्शनपर गाणे . आयुष्य गंडल्याची खरी प्रचिती आली !
हे गाणं संपल्यावर मी तंद्रीतून जागा झालो . बेलवंडी फाटा गाठला होता . मी वरती म्हटल्याप्रमाणे कितीही कोंबून बसलं तरी ही राक्षसी ताकदीची गाडी चालतेच ! गाडी आल्यावर फाट्यावर हालचाल जाणवली . ड्रायवर शेजारच्या गोल काळतोंडया सद्गृहस्थाने तोंडाचा चंबू करून लालभडक पिचकरीने श्रीगोंदा रोडला अभिषेक घातला . तोवर मागच्या बाजूला माझ्या शेजारी एक तरुण बाबा आणि म्हातारी बसले . बळबळं दार लावलं .
दमदार अक्षीलेटर दाबत गाडी निघाली . सोबत जमेल तितक्या मोठ्या आवाजात गाणे होते 'आप का आना ,दिल धडकाना , मेहंदी लगाके, यू शरमाना । प्यार आ गया रे,प्यार आ गया ।' अलका याग्निक आणि कुमार सानू यांची अशी कितीतरी गाणी प्रवासात मदत करतात . खड्डेभरल्या रस्त्यावरून गाडी सुसाट निघाली .
"इकडं सारा उसच बया ! आमच्या नगराला काहीच नाही ! "म्हातारी उवाच . म्हातारीकडे कोणीच लक्ष दिलं नाही . गाडी लांडग्याच्या ओढ्याच्या पुलावर आली .
' मिली जो नजर , हुवा ये असर ....' पुलाची दुर्दशा बघून मला वाटलं या पुलाची नजर कोणाशी मिळत नाही का ? ह्यो रस्ता का नीट होत नसेल . आमदार कोणीही असला तरी दैठणच्या भोळ्या भाबड्या जनतेला बबनराव पाचपुतेंकडून आशा असतात . 'बबन पाचपुत्या ह्यो रस्ता नक्की नीट करिन ' अशा गप्पा मी याआधी गावात ऐकल्या होत्या .हा विचार करत असतानाच म्हातारीने बडबड सुरू केली .
"कुठं जायची ?"
"ढवळगाव"समोरचा गोरगोमटा गोलू गृहस्थ उत्तरला .
म्हातारीला ऐकू आलेच नाही .
"दौंड ?????"
"नाय व , ढवळगाव म्हणलं मी "
"ढवळगाव व्हय !!!म्या म्हणलं का दौंड "
'मला बी जायची लेकीकड , लेकी लै मोठ्या घरी दिल्यात .....'
म्हाताऱ्या माणसाला घरी बोलू दिले जात नाही . त्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले की हे लोक असे पब्लिक स्पीकर बनतात . आज्जीला कोणी रिप्लाय देत नसल्यामुळे तिनी तिचा डाटा ऑफ करून बसायला हवं होतं पण तसं झालं नाही . ती शांत बसलेली देखवली नाही म्हणून की काय शेजारच्या ढोल्या श्रीमातींनी तिला विचारले
"कुठून आल्यात तुम्ही ?"
आता त्या श्रीमतींना हे वाक्य बोलायला फार सोप्पे गेले असेल पण त्यानंतर बिनबोभाट लेक्चर ऐकायला त्या हौद्यात बसलेल्या 12 जणांच्या चमुला भाग पाडले .
म्हातारी बोलू लागली . स्टेट बँकेच्या गचाळ अनैतिक संबंधांमुळे माझ्या ब्रेनचा व्हाइट वॉश झाल्यासारखा मी बस्लो होतो .
"लेक नेऊन घातलाय कापूरवाडीला , पहाडावर . लै येड्यावणी करतोय . काय नाय गं पोरी . लेकी चांगल्या निघाल्या पण
ल्योक बिघडले "
म्हातारी कावरीबावरी झाली होती . तिच्या उतारवयात तिला होणाऱ्या वेदना मांडायला जागा नव्हती . ल्योक चांगला न निघण्याची सल होती . लेकीकडे आसरा मिळेल ही खात्री . त्यामुळे भल्या संध्याकाळी ती तिकडे निघाली . जमाना कितीही खराब असला तरी आपण कोणावर ना कोणावर भरोसा ठेऊन असतो . कुठेतरी व्यक्त होत असतो . आपली हक्काची जागा शोधत असतो . काळ पुढे जात असतो .
एव्हाना समोर बसलेल्या तथाकथित तरुणाने कानातले हेडफोन काढून ठेवत असताना दैठणच्या कॉलनीवर मी गाडी थांबवली .खाली उतरलो . ड्रायवर महाशयानें 15 रुपये घेऊन पाच रुपये इमानेइतबारे परत केल्याच्या आनंदात मी बॅग अडकवली . गाडीतल्या गाण्यांचा आवाज आधी वाढला .
'अगर तुम मिल जाओ , जमाना छोड़ देंगे हम...' नंतर गाडीचा वाढला .
हे गाणे मी स्टेट बँकेशी असलेल्या नात्याशी कॅम्पेअर करून बघितले पण कुठेच जुळले नाही . दोनतीन ठेवणीतल्या शिव्या यथेच्छ आसडून मी सूर्यास्त बघत चालत राहिलो ...
-अजिंक्य
Comments
Post a Comment