तिच्यायला , आज सकाळपासून निस्ती गॉड बोलायची भाषा करत्येत सगळे . नाय तव्हा समोर आले तरी बोलत न्हाईत . सकाळपासून कणभर तीळ आन मणभर गुळानी लै चिक्कट चिकट वाटाय लागलंय . म्हणे तिळगुळ घ्या अन गॉड बोला . च्यायला काय रीश्वत देतो का धमकी ? अवघड हे भो . काही म्हणे हॅप्पी संक्रांती . आता तू म्हणल्यानी हॅप्पी होणार आसन तर कसं व्हायचं ? काहींनी माझ्या मनात कडूपणा हाय आसं धरून मला त्यो बाहेर टाकायला सांगितलं . बघू राव . च्यायला .काहींनी पतंग बी पाठवले . माझी किती पाखरं मरतीन आज . काही लाज हाये का तुम्हाला . औंदा आमच्या बा नी राखण नाय केली जवारीची . च्यायला सक्काळ सक्काळ २ हजार पाखरू येतं रानात . लै गॉड दिसतं ते .
आमच्या एळेला एखाद्याच्या बड्डेला 'ह्याप्पी बड्डे' म्हणाय बी लाज वाटायची .म्होरं ती कमी झाली . 'थ्यांकू' म्हणाय आम्ही लै लेट शिकलो . तसं बगायचं झालं तर आमचे गुर्जी आम्हाला शिकवायचे पण आमी कधी म्हनलो नाय कुणाला . दिवाळीच्या , वाढदिवसाच्या सुभेच्छा द्यावा लागत्यात हे बी लै लेट कळलं . आमच्या इकडं साळत एखांद्याचा बड्डे असला की बाई त्याला उभा करायची . मंग आम्ही मोठ्या आवाजात एक साथ हॅप्पी बड्डे टू यु . ....हॅप्पी बड्डे टू यु ...आस म्हणायचो . त्ये पोरगं रंगीत कापडं घालून यायचं . त्येला बाई गुर्जी त्या दिशी मारायचं नाय . पोरं सोरं गॉड बोलायची . त्याच्या कड लै गोळ्या असायच्या अन त्या मिळुस्तर अन मिळल्याव बी त्यो डॉन असायचा .
तर लै इशयानंतर नको . आम्ही असले शिष्टाचार शिकलो ते थोडं लेट . नंतर सगळेच म्हणत्यात म्हणून हॅप्पी दिवाळी , हॅप्पी न्यू इअर म्हणायचो . वगैरे म्हणायचो पण लै कमी . एकदा फोन घेतला आम्ही . तवा कोणाशी बी बोलायला म्हणलं की थरथर कापायचो . उगं गाळलेल्या जागा भरल्यावानी आम्ही हुं... आत्ताच...मगाशीच...आईनी....तिकडं.... अशा गप्पा मारायचो . फोन आला की फोनचं अप्रूप वाटायचं पण जर आपल्याक फोन दिला तर लै कसतरी व्हायचं . त्यामुळं 'धरलं की चावतंय अन सोडलं की पळतंय' अशी गत व्हायची .
नंतर मोठाल्या लोकांशी कसं बोलावं , कसं वागावं याला 'म्यानर्स' म्हणतात असं समजलं . थोडं वाचन बिचन वाढलं . हुशार विद्यार्थी म्हणून उलसक वजन होतं . मंग आम्हाला योक बाबा भेटला . आता परत्येक जण एखाद्या बाबाकडून चांगला आपाटलेला असतो . तसा मी बी आपाटलो . मंग त्याच्या सांगण्यानुसार आम्ही 31 डीशेम्बरला कोणालाबी सुभेच्छा दिल्या नाय . सकाळ सकाळ सुप्रभात आसं शहाण्या माणसासारखं बोलाय लागलो . तर त्या बाबाला नंतर सोडला पण त्याचा इधं उल्लेख येतो कारण हा विश करण्याचा इतिहास मी सांगतोय .
मंग मस्त हातात हात देऊन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा असं आम्ही म्हणू लागलो . पोरी सोरींना जरा लांबूनच म्हणतो . आता भाषा बी सुधरत गेली . आम्ही बी सुधरलो . मोबाईल घेतला . मंग काय सांगायचं . इकडं तर निस्ती कोंपेटीशन हाय राव . कोण कुठं गेलंय , काय खातंय , काय करतंय , काय बघतंय समदं कळाय लागलं . मंग यांनी शिवजयंती म्हणू नको , आंबेडकर जयंती म्हणू नको, मोदीचा , मनमोहनसिंगचा बड्डे म्हणू नको काही सोडलं नाय . बरं आपलं स्टेटस कोणी बघत नाय तरी त्याचं विश . येडे लोक लै वाढलेत .
आता आज गॉड बोलण्याचा इषय निगालाच हे तर बघू जरा गॉड बोलून . खरं सांगतो सक्काळधरून एक बी फोन आला नाय . गॉड बोलणारी लोकं हायेत थोडी पण तीधं फोन करायची गरज नसती .बाकीच्यांनी चांगले चांगले फोटू पाठीवले . आता मला सांगा कितीबी फोटू पाठवले तरी त्याचा काही फायदा हे का ? त्यात भावना हाये का ? उगच आपला कचरा फेकीतेत हे .एकालाबी रिप्लाय नाय दिला . काहींनी फोनला , ग्रुपला मुंग्या लागायची भीती बी व्यक्त केली . त्येंना म्हणावं काळजी नसावी .
त्यात कोणाची तरी नकट्या नाकाची नथ घातलेली दातपडकी पोर नऊवारी घालून लै फेमस झाली . तिची ती क्लिप लै येळा पाठवली मला लोकांनी . पण यंदा असली नवी पोरगी नाय आली . तीच होती सगळीकडं . काहींनी भली मोठी माहिती पाठवली . तीळ कसा , गूळ कसा , मंग हिंदू संस्कृती कशी ग्रेट वगैरे वगैरे . काहींनी भूगोल समजून सांगितलं . लोकं जास्ती फॉरवर्ड निघालेत म्हणून निस्ते फॉरवर्ड करीत राहत्यात . मधी बीबीसीनी फेक न्यूजचं घेतलेलं ते आवडलं बरका आपल्याला . त्यांनी एकदा या लोकांवर बी काहीतरी घ्यायला पायजे . ब्रॉडकास्ट लिष्टित गुड मॉर्निंगचा मॅसेज बाप मेला त्येला जातो . मग त्यो तळतळून स्टेटस टाकतो . कळविण्यास अत्यंत दुःख होते की .....' बरं आता हे झालं की सगळे पुन्हा आपापलं कळफलक घेऊन तयार . RIP . च्यायला लै वैताग . RIPचा अर्थ मला औंदा कळाला . असो .
दुसरा मुद्दा असा की का गॉड बोलायचं ? जे हाये ते बोलुदे ना ! चूक बरोबर होऊन जाऊदे ना . आता काहींनी अशे बी स्टेटस ठिवले की 'तोंडावर जसं गॉड बोलता तसं मागं बी बोला ' . असुद्या ज्याच्या त्याच्या भीताडावर त्यांनी त्यांनी त्यांचा त्यांचा कळफलक बडवून लिव्हलय . पण स्टेटस चा , व्हाट्सअप्प , फेसबुकच्या मॅसेजचा काही फायदा नसतो .
सण साजरा करा राव पण इधं कुढं ? आमच्या येळेला आम्ही पिश्या घेऊन हे गावात निगायचो . सगळ्याकुन उलीऊली तिळगुळ घ्यायचो . शर्यत लागायची कोणाचा तिळगुळ जास्ती . मंग पुढला आठवडाभर त्ये खायचे . लै भारी वाटायचं . सारा गाव आशीर्वाद द्यायचा . जाती बिती न बघता नाती बघायचा . मोठाल्या लोकाच्या पाया पडायला येळ नाय आजकाल पोट्ट्यांकडं ! बिझी स्टेटस ठेऊन फिलिंग नॉट वेल परेंत जाण्यापेक्षा जा ना आईबापाच्या , आजूबाच्या कुशीत . मणभर आशीर्वाद मिळल . आन आयुष्यभर नाय गम होणार . सण करा लेको , पण पद्धती बदला . गॉड बोलण्यासाठी , गॉड राहण्यासाठी सुंदर , जित्त्या माणसांची गरज असती . हल्ली जित्ती माणसं नाय सापडत . ती जित्ती माणसं बना . म्हणजे शोधायचं झालं तर सापडतील तरी .
-अज्या
Comments
Post a Comment