असं म्हणतात दिवाळीचा दिवा लागला की चारा वाळायला सुरुवात होते. एकदा का डोंगराचा चारा वाळला की कुसळांचं मायावी राज्य सुरू होतं. वातावरणात थंडी भरलेली असते. हात पाय कोरडे पडलेले असतात. त्यात दिवाळीदरम्यान लावलेल्या तेलामुळे हातावर फुफाटा बसतो आणि हात पाय उकललेले असतात. ऊन असलं तरी दिवसभर थंडी वाजत असते. अशा वेळी कूसळं असली तरी फुल कपडे घालून गुरं वळायला जावं लागतं.
हात दोन हात लांब काठी , कातड्याच्या चांभाराकडून बांधलेल्या मोक्कार जड निबर वहाणा, डोक्याला टॉवेल अशा अवतारात आम्ही निघायचो बोरं खायला. गुरं कसणात लावून द्यायचे आन एक एक बोर पार झोडून खायची. सुरुवातीला कुढंमूढं एखादं अर्ध बोर पीकलेलं असतं. तेव्हा मात्र काठीने फक्त तेवढंच पाडायचं. ते बोर चघळून चघळून पार गिठुळी मोकळी करायची. मग ती गिठुळी फोडून त्यात शेंगदाण्यासारख्या दोन पाकळ्या निघत्यात त्या खायच्या असं आम्ही दिवसभर भटकायचो.
बोराटीत एकदा हात घातला की 100 टक्के काटे घुसणार असतात. बोरातीचे काटे वाघ नखांसारखे असतात. घुसले की फाडुनच बाहेर येतेत. फुल बाह्यांचा शर्ट असेल तर दोरे उधडून निघतात. हळू हळू सगळ्या बोरी पिकायला लागतात मग मात्र चंगळ असते.संध्याकाळी भाकरी खाता येत नाही एवढे बोरं आम्ही खायचो. दात आंबले की लै अवघड. मग मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करून, मिठानी दात घासून बळंबळं दात लाईनीवर आणायचे.
बोराटी उंच असली की दगड मारून बोरं पाडावी लागायची. मग एखादा दगड वरच अडकून बसायचा. आपण बोरिखाली गेलं की वाऱ्याने तो दगड नेमका डोक्यात पडणार. पोरगं रक्तबंबाळ!! रडत रडत घरी जाणार आई त्यात कात, हळद भरणार आणि मोक्कार चोपणार!!
वरती बोरं बघत चालता चालता खाली भला मोठा साप पार पायात घोटाळायचा! लेंडी पातळ व्हायची च्यायला!! एक साप बघितला की पुढचे 15 दिवस लै भ्याव वाटतं. पुन्हा रुटीन बसतं. कुसळं, काटे, आघाड्याच्या तिरम्या, आरखाडी, खैराटी सगळं वरखडलेलं असायचं संध्याकाळ पर्यंत. संध्याकाळी निवांत बसल्या बसल्या चड्डीचे, शर्टाचे कुसळं काढायचे हा एक कार्यक्रम असायचा. खिशात आणलेले बोरं आईला, आजीला द्यायचे. लैच आणले असतील तर मंगळवारच्या बाजारात विकून पैसे कमवायचे या इराद्याने झोपी जायचं. रात्री अंडरपँटीला कुठं तरी कुसळ टोचत राहायचं. साला रातभर सापडत नसायचं. बोरं विकून मिळालेल्या पैशाचं काय करायचं याची स्वप्न मात्र रातभर पडत राहायची!
#बोराटी
Comments
Post a Comment