Skip to main content

गावपण भाग 2 : खिळपाट


खिळपाट

गावपण या सदरात आपण गावाकडच्या तिखटमीठ आठवणी ,शब्द , संस्कृती आणि संकल्पनांचा स्वैर आनंद घेणार आहोत .या गावरान जमान्यातील काही गावरान संकल्पनांना मोकळी वाट करून देण्यात माझाही काही वाटा असावा. 
 या उद्देशाने आज खीळपाट काय असते ते बघुयात.


खिळपाट म्हणजे एकावर एक दगड कलात्मक आणि रचनात्मक पद्धतीने रचून बांधलेली भिंत .पूर्वी 'कोपी' किंवा 'सप्पर' बांधण्यासाठी छातीइतक्या उंचीची दगडाची आणि फक्त दगडाची भिंत रचली  जायची त्याला म्हणायचे 'खिळपाट' .त्याला काही ठिकाणी 'पवळ' देखील म्हटले जाते .
आमचे आजोबा गोविंद दंडवते म्हणजेच आख्ख्या गावाचे छबूतात्या यांच्यासोबत दोन खिळपाट बांधण्याचा योग माझया पत्रिकेत आला हे केवळ भाग्यच . आता खिळपाट बांधायला सुरुवात झाली ती टिकावाने थोडा पाया खांदला .जमीन साफ केली आणि मग तोडी रचायला सुरुवात झाली . एक एक मोठाल्या तोडी  मी दादांना आणून द्यायचो . 'तोड' म्हणजे विशिष्ट आणि रचता येईल असा उपयुक्त दगड . पोटात नळ येईपर्यंत उचललेल्या तोडी अजूनही लक्षात राहिल्या आहेत.खिळपाट साधारण दोन फूट रुंद असते.  लांबी आपल्या गरजेनुसार . एकूणच निसर्गातल्या उपलब्ध साधनांचा वापर करून माणसाने उभारलेला एक नमुनाच हा .

              तोडीखाली चिप घालायची आणि मग ती तोड अगदी गणपतीसारखी विराजमान व्हायची .प्रत्येक तोड अशी काही बसवायची की आयुष्यात परत हालचाल नको ! अशा वेळी पाया मन लावून रचावा लागायचा कारण संपूर्ण भिंत केवळ पायावर उभी असते . त्यामध्ये सळ्या किंवा पिलर चा आधार नसतो . एक एक तोड रचली गेली आणि साधारण गुडघाभर खिळपाट तयार झाले . एकदा दुपारी दुपारी दादा कुठेतरी गेले आणि मी तिथे सिव्हिल इंजिनिअर झालो . माझ्या सिव्हिल इंजिनेरींगची सुरुवात बहुतेक तिथूनच झाली असावी . मी एक भली मोठी तोड आणली . काम मधीच बंद झालं होतं. खालच्या दगडावर आणलेला दगड ठेवायला गेलो पण दोन दगडांमध्ये माझी करंगळी कधी गेली कळलीच नाही आणि वरून भाला मोठा दगड ठेवला . करंगळीचं पार भजं झालं .  करंगळी पार काळी निळी झाली . च्यायला परत एक पण तोड उचललेली आठवत नाय .महिना दोन महिने डाव्या हाताच्या करंगळीने खाल्ले ! ते दिवस आठवले कि ते खिळपाट , ती गावरान, शिवराळ , रांगडी भाषा आणि ते जुने पहाडी लोक आठवतात . तो जमाना खरंच भारी होता . अजूनही दोन खिळपाट उभीं आहेत आमच्या घरी जुन्या इतिहासाची साक्ष देत!

           कधी कधी यात लाकडाच्या मेडी रोवल्या जात त्या वरती छप्पर बांधायला उपयोगी पडतात . पण कुठेही सिमेंट नसले तरी खिळपाट ढासळत नव्हते हे नक्की . अशी झोपडी खरच खूप सुंदर असते . उन्हाळ्यात थंडगार वातावरण असते पण पावसाळ्यात मात्र खालून पाणी अक्षरशः वाहते !!! त्यावर घमेले पालथं घालून रात्री काढल्याचे जुने जाणते सांगतात . हिवाळ्यात थंडी खूप लागते आणि शेवटी किडमुंगीची भीती तर आहेच .
         तर असे हे खिळपाट माझ्या चांगले लक्षांत राहिलेलं. खिळपाटावर पुढे तोंडल्याचा वेल वाढला . वेलाची चांगली अडचण झाली . एकदा पावसाळ्याचे दिवस होते . मी शाळेतून घरी आलो. खिळपाटापासून पुढे चाललो होतो. जात जाता तोंडल्याच्या  वेलीवर हात फिरवला . तोंडली मिळतील ही माफक अपेक्षा पण अपेक्षाभंग झाला आणि भाला मोठा नाग फाडी काढून उभा . साक्षात भगवान शंकर काळे भोर करवंदाएवढे डोळे उघडून फूस फूस ... घाम , धक्का आणि थरथर यांचे सुरेख कॉम्बिनेशन कधी ओरडण्यात झाले हे त्या शंकरालाच माहिती . ढुंगणाला पाय लावून जे पळालो ते थेट आईच्या कुशीत . आयुष्यात परत खिळपाटाच्या वेलीवर तोंडली तोडण्याची हिम्मत झाली नाही!

           एकदा कधी आईने खिळपाटावरचा भोपळा काढायला सांगितला तर त्यालासुद्धा माझा साफ नकार ! खिळपाटाच्या फटींमध्ये कितीही पाचर घाला , विंचूकाटा असणारच .कारण सिमेंट काँक्रीटचा वापर नसल्याने खिळपाटात खूप फटी राहायच्या पाचर घातली तरी सुद्धा .'पाचर' म्हणजे दगड स्थिर राहावा यासाठी खालून छोट्या आणि चपट्या दगडाचा दिलेला आधार .या फटींमध्ये किडा मुंगी ,काका मामा वास्तव्याला असतातच . त्यामुळे खिळपाटाचा शक्यतो नाद करायचा नाही! कितीही चिपा घाला ,कितीही फटी मारा पण साप, धामिण शिरणारच. यावर एकच उपाय खिळपाट लिंपून घेणे पण उंदीर जमू देत नाहीत . चिंचदरा म्हणजे काय चेष्टा वाटली कि काय तुम्हाला ?

सगळे असतात इकडे . येता जाता भेटतात. हे प्राणी पक्षी ग्रामीण जीवनाची शान असतात .आपल्या  साडूनं लांबूनच ओळख द्यावी तसं  मान टवकारून हे प्राणी पक्षी राम राम घालतात .मग गप्पा होतात, गाणी होतात. आता त्या खिळपाटावर बसून चिमण्या , कावळे , साळुंक्या , पोपट गाणी गातात . तिथेच खातात . सुरु असतो त्यांचा निसर्गक्रम ...आनंदाने ते पाहत बसतात आधुनिकतेचा मांडलेला संसार....

                   -अजिंक्य

Comments

  1. सुरेख शब्द रचना.....

    ReplyDelete
  2. Wah !!! Ye read kr k yesa lag rha tha jaise ki me khud waha pe hu ...

    ReplyDelete
    Replies
    1. खूप छानआवडला.जुन्या गोष्टी सगळ्यांना माहित होणं फार गरजेचं आहे.

      Delete
    2. धन्यवाद ,आपल्या प्रतिक्रिया माझी प्रेरणा आहेत

      Delete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...