वाटलं नव्हतं तू असा असशील ....
मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो फक्त समाजामूळे आणि त्याच्या समाजातील आस्तित्वामुळे ...अनेक नाती ,त्या नात्यांची वेगळी अंगे ,त्यांची भिन्न भिन्न भावविश्वे जपत हे आयुष्य पुढे जात असतं .आपल्या आपल्या परीने पूर्णत्व गाठत असतात .ही आयुष्ये पूर्णत्वाच्या अनेक नव्या व्याख्या बनवत असतात तर कधी पूर्णत्वाची परिमाणे बनवून नवे उच्चांक आदर्श म्हणून समाजापुढे ठेवत असतात .
काल परवा एका जुन्या मैत्रिणीला भेटण्याचा योग आला .महाविद्यालयातील भेटीनंतर अनेक दिवसांनी भेटल्याने खूप आठवणी अगदी ढगफुटी व्हावी तशा बरसून आल्या .अचानक बांध फुटावा तशा पसरत गेल्या पौर्णिमेच्या टिपूर उन्हासारख्या …आणि एक अनामिक सुंदर स्पर्धा सुरू झाली आमची दोघांची त्या आठवणींना वेचण्याची ….आपल्या छोट्या छोट्या हातात मिळेल त्या आणि मिळेल तितक्या क्षणांना साठवून एकमेकांना देण्याची ही स्पर्धा अशीच सुरू राहावी असं मला मनोमन वाटत होतं …या स्पर्धेला अतीव सुंदर आणि निकोप वळण होतं .एकमेकांना फक्त हसवण्यासाठी क्षण वेचण्याची घाई होती .अनेक पूर्वग्रह क्षणात खोटे ठरत होते आणि नवीन मतं बनत होती .दोघांनाही नवे सुर सापडत होते .एकमेकांबद्दलचे गैरसमज दूर होत होते .असे संवाद आयुष्यात नेहमी यायला हवेत .
इतक्या दिवसांनंतर भेटल्यामुळे स्वभाव आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी बदलली होती ,परिपक्व झाली होती .त्यामुळे अनेक विषयांवर माझी मतं बदलत गेली होती .प्रत्येक गोष्टीकडे मी माझ्या स्वतः च्या चष्म्यातून पाहत होतो त्यामुळे तिला माझ्यातला बदल आणि नवेपणा वेगळा भासत होता .ती अजून तशीच होती बालिश थोडीशी बिनधास्त …जुन्या काही आठवणी आठवून अख्ख तोंड लपवत होती .लाजून लाल होत होती .एवढ्याशा हाताने तो सुंदर चेहरा काही केल्या लपत नव्हता पण प्रयत्न मात्र ती मनापासून करत होती .हा संवाद माझ्या आकाशाखालच्या आठवणींना काहीसा पहाटेच्या धुक्याचा स्पर्श देत होता .
बऱ्याच वेळ गप्पा मारून झाल्यावर निरोपाची वेळ यायची पण पुन्हा एखादी आठवण अचानक यायची. पुन्हा तेच हसणं आणि त्यात रमणं …एक वेळ आली जेव्हा खरोखर निरोप घ्यायचा होता .कुठलीही हुरहूर नव्हती आणि अडकणं नव्हतं ..केवळ नितळ नातं होतं …शेवटी ती म्हणाली “फार बदलला रे अज्या ….वाटलं नव्हतं तू असा असशील …” ही प्रतिक्रिया मला अनपेक्षित होती .पण अनेक सवाल उभे करून गेली .
आपण का तपासून बघत नाहीत आपले पूर्वग्रह ? आपण का बनवून बसतो चुकीची मते ? का आपण संवाद साधत नाही ? आकाशाखाली का जगत नाही आपण प्रत्येक गोष्ट स्पष्ट करून ?
तिचा निरोप घेतला आणि मनात प्रश्नांचे सुर रुंजी घालू लागले ….थोडा वेळ ते अनामिक गाणं ऐकलं आणि पावलांनी वेग घेतला होता आणि तोंडातून उद्गार बाहेर पडले होते “ क्लिअर है बॉस ……”
-अजिंक्य
Copyright@ajinkyadandawate
Comments
Post a Comment