Skip to main content

आकाशाखालच्या आठवणी 1

स्टुपिड …

      मला माझ्या जाणत्या वयापासून आव्हानांनी खचाखच भरलेल्या आणि बिनधास्त बावळट जीवनांचा हेवा वाटायचा .आपणही ही जीवन जगावं असं मनोमन वाटायचं .आव्हानांना पोलादी हातांनी आणि वज्रमुठींनी फोडून काढावं असा वाटायचं .छातीतल्या धगधगणाऱ्या निखाऱ्याने संकटांना होरपळून काढावं वाटायचं .श्वासांच्या वादळाने त्या आव्हाणांची फोलपटांसारखी अवस्था करावी वाटते .कधी वाटतं इतकं बावळट व्हावं की आव्हानांनीच आपला पाठलाग करणं सोडून द्यावं .इतकं बेफिकीर व्हावं की अडथळ्यांनाच  माझा हेवा वाटावा .जरी अडखळलो तरी ,जरी धडपडलो तरी त्याची काहीही तमा बाळगू नये . मान्यच करू नये की हा माझा अपमान आहे .मान्यच करू नये की ही माझी हार आहे .किंबहुना कळूच  नये मला की हार काय आणि जीत काय ?इतकं स्वतंत्र व्हावं की एखाद्या आसमानाचा तारा व्हावं ,इतकं दिशाहीन व्हावं की आभाळाचा छोटासा तुकडा …पण तुटलेल्या पतंगाचं स्वातंत्र्य मला आवडत नसायचं कारण आयुष्याला काही अर्थ असावा उद्दिष्ट असावीत ही मात्र माझ्या विचारांमधली एक पक्की बाजू होती .कशी तयार  झाली होती माहीत नाही .




        यातलं आव्हानांना स्वीकारून एखाद्या राकट योध्यासारखं पुढं निघून जावं या आयुष्याच्या एका सरधोपट मार्गावर मी चालत होतो .संकटं ही मेजवानी वाटू लागली होती .आव्हाणं स्वीकारण्याचा  आणि ती पूर्ण करण्याचा  आणि त्या यशाच्या चढलेल्या नशेत वावरण्याचा माझ्या  जीवनपद्धतीचा एक ढंग बनला होता .माझ्या अजिंक्य नावाला अजिंक्य ठेवणारी ही एक सोची समझी चाल …

     ही राकट शौर्य सुद्धा मला नीरस वाटायला लागलं .त्या यशाची ,विजयाची नशा आता चढत नव्हती .ते सोहळे आता बेचव वाटू लागले .त्या टाळ्या ,तो जयजयकार ,त्या आरोळ्या आता बेजान वाटू लागल्या आणि मनाचे पक्षी बागडू लागले चांदण्यांच्या प्रतिभासंपन्न धवल धुक्यात जिथून अनेकदा सापडतात नव्या सोनेरी भविष्याच्या तेजोमय कडा .आणि मग त्या तेजल कडेच्या प्रत्येक बिंदुला आणि त्याच्या आस्तित्वाला असलेला गूढ अर्थ समजत  जातो .हाच चंद्रकिरणांचा प्रदेश भेटला कॉलेज नावाच्या क्षितिजावर .आयुष्यात अनेक क्षितिजांवरून भ्रमण करत असताना हे  क्षितिज मात्र नेहमी दिसत राहील .

      जीवनाला नवे अर्थ मिळताना खरंच इतका वेगळा आणि स्वच्छंद अर्थ मिळेल असं वाटलं नव्हतं .या चंद्रकिरणांच्या प्रदेशात सगळेच लोक एक एक परी शोधत असतात .मला सापडली होती .ती सुंदर होती ,ती बालिश होती .जगापेक्षा तिला स्वतःच्या आयुष्यात रस होता .मला हेवा वाटणाऱ्या त्या बेधुंद आयुष्याची ति प्रतिकृती होती ..तिला नव्हती चिंता जगाची ,आव्हानांची आणि अडथळ्यांची ...सहज पेश होत होती ति प्रत्येक वेळी अगदी अलगदपणे ..कसलाही ताण नव्हता ..ति  भेटली आणि माझ्या डायरीत एक वाक्य उमटलं जे कदाचित माझ्या आयुष्यातील एका अत्यंत महत्वाच्या हळुवार क्षणांची साक्ष होतं.तिचा तो स्वैर अंदाज आठवला आणि मी लिहिलं"तुझं मला भेटणं हा अगणित दिशांचा अकस्मात शोध होता ."

    ति भेटायची आणि माझा आव्हानं पेलून त्यांना फोडून त्यांना  जाळून भरलेल्या कातळी छातीमध्ये काही वेगळेच सूर ताल धरायचे .मलाही तेच बालिश आणि काही अंशी बावळट आयुष्य हवहवंसं वाटायला लागलं.तिचा सहवास मला बदलत गेला आणि मी माझ्या आयुष्याला स्वातंत्र्याच्या भिरभिरणाऱ्या वाऱ्यावर झोकून दिलं.त्या निरागस चेहऱ्यावर नजर रोखाताना तारांबळ व्हायला लागली .मी आवारा झालो .मी वारा झालो .एका अनाकलनीय दिशेच्या स्वर्गीय क्षितिजाकडे माझा प्रवास सुरु झाला .
    एकदा ति आणि मी गप्पा मारत होतो .गप्पांना आता विषयांच बंधन असत नव्हतं.मुक्त संवाद होता बालिश मनांचा .तिला माझ्यात रस नव्हता आणि मलाही ..पण मी शिकत होतो ते विलक्षण आयुष्य प्रात्यक्षीकांच्या  माध्यमातून ...मला तिने वेडं करून सोडला आणि मी झालोही .त्या बावळट ,बालिश आणि आवारा जीवनपद्धतीचा मी भाग झालो .ति मला स्टुपिड म्हणायची .मला स्टुपिड चा अर्थ नीट कळतही नवता आणि मी तीला  विचारलं "स्टुपिड म्हणजे काय गं?"आता तिच्या मोकळ्या हसण्याने मला स्टुपिडपणाचं प्रमाणपत्र आणि प्रशस्तीपत्र एकाच वेळी मिळालं...
   हा स्टुपिड शब्द आणि तो स्टुपिड बालीशपणा माझ्या आयुष्यात एक बिनधास्तपणा देऊन गेला .हळू हळू अडथळे मला अडकवून कंटाळली ...संकटाना टाईमपास घेत  गेलो आणि पुन्हा यशाच्या त्या शिखरांना स्पर्श केला जी कधी मी मिळवली होती .ती आली आणि आयुष्याला नवा अर्थ मिळाला . अर्थांचे संदर्भ बदलले. जादुई आणि गुलाबी वातावरणात भारलेले ,मंतरलेले दिवस सुरू झाले . तिच्या येण्याने स्टुपीड जिंदगीला आनंदाची रेखीव किनार मिळाली.
      आता मात्र स्टुपिड आयुष्यात मस्त आहे .इथे मरण स्वस्त नाही पण जगणं महाग नाही .मरण्याची भीती नाही पण जगण्याची मजा आहे .संकटांची भीती नाही त्यांना भिडण्याची सवय आहे .आनंदाची नशा नाही तर हे आयुष्यच नशा आहे .जे तिने मला दिलं .आणि त्याच आयुष्याची एक प्रथा म्हणूण तिचे धन्यवाद अदा करण्याचंही भान मला राहिलं नाही .खरच स्टुपिड आहे मी ...खूप काही मिळालं मला ..आवडतं मला हे  "स्टुपिड “जगणं ....

अजिंक्य दंडवते
copyright@ajinkyadandawate
Photo by avinash jadhav.

Comments

  1. "मनाचे पक्षी बागडू लागले चांदण्यांच्या प्रतिभासंपन्न धवल धुक्यात जिथून अनेकदा सापडतात नव्या सोनेरी भविष्याच्या तेजोमय कडा .आणि मग त्या तेजल कडेच्या प्रत्येक बिंदुला आणि त्याच्या आस्तित्वाला असलेला गूढ अर्थ समजत जातो"
    खूपच छान वाक्यरचना अजिंक्य....असच लिहीत राहा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...