Skip to main content

गावपण भाग 1: मळ्यात पुस्तकवाचनाचा स्वर्गीय अनुभव

गावपण : मळ्यात पुस्तकवाचनाचा स्वर्गीय अनुभव

धुक्याने भरलेली वाट चालताना ओढ्याच्या खळखळ आवाज यावा आणि त्या आवाजाच्या शोधात एका मोठ्या दरीचा शोध लागावा असाच काहीसा अनुभव असतो मळ्यात पुस्तकवाचनाचा .
रानात निसर्गाच्या कुशीत ,सुगंधी वाऱ्याच्या मंजुळ लहरींचा अनुभव घेत वाचन करणे म्हणजे समाधी अवस्थेची अनुभूतीच. प्रत्येक गोष्ट अनुकूल असते आणि विश्वाच्या अस्तित्वाचे गूढ उलगडत ब्रह्मज्ञानाचे महाद्वार उघडावे तसा सगळा परिसर अगदी मनमोहक असतो . एका दिवसात एक पुस्तक वाचून संपवण्याची हिंमत मी दाखवू शकतो ती  या निसर्गाच्या प्रेमळ असण्यानेच.


 . केवळ निसर्ग आणि आजूबाजूला पक्षांचा गुंजारव ...अगदी छोट्या पक्षापासून घारीच्या झेपेपर्यंत सगळ्या गोष्टी बघायला मिळतात . ऊन सावलीचा स्वतंत्र खेळ सुरू असतो आणि खारुताईचा काहीतरी उद्योग सुरू असतो . प्रत्येक गोष्टीचा वास घेऊन ठेवण्याची कुत्र्याची घाई सुरू असते . गाय भराभर गवत खात असते तर वासरांचे हुंदडणे सुरू असते .
शेळीचा आणि करडांचा आवाज हळूच येत असतो  . वारा झाडांमधून जाताना थोडीफार पानं गळतात ,ती हळूच जमिनीवर विसावत असतात तर फांद्यांचा एकमेकांना घासून करकर आवाज होत असतो . सगळं कसं अगदी लीलया घडत असते . आपण शांत बसलेलं बघून कधी कुत्र्याला बोर होत असावं .
तो जवळ येतो . लाड घालतो . आणि त्याला भाव दिला नाही की चिडतो . जी गोष्ट हातात आहे ती घेऊन तो पळायला बघतो . हातात पुस्तक असेल तर त्याला फारच राग येतो का कुणास ठाऊक ?? कदाचित तो देखील सांगत असावा की जगण्यासाठी लागणारं ज्ञान इथे निसर्गात देखील मिळते . त्याकडे फक्त निस्वार्थ भावनेने बघायला शिक .मग हळूच एखाद्या कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला की हातातलं सगळं काम सोडून तो कुत्रा त्या आवाजचं संशोधन करतो . त्याची दिशा ,वास ,आवाजाच्या तिव्रतेवरून अंतराचे अंदाज बांधताना त्याच्या शरीराचा एक भागही हलत नाही . अत्यंत सूक्ष्म अभ्यास करून तो शांत होतो . पण संकट अगदी दहशतवादी हल्ला आहे अशा तत्परतेने त्याची हालचाल असते . खरच हा गुण आपणही शिकायला हवा .
मग पुढे पोट भरल्यामुळे म्हातारे बैल एकमेकांना प्रेमाने चाटत उभे असतात . त्यांच्यात इतके दिवस साथ दिल्याची कृतज्ञता असते . त्यांच्या संवादाची मुकी भाषा आपल्यालाही कळत जाते . घरच्या वासराच्या आवाजाने गाईचे थोडे लक्ष विचलित होते पण आता त्या वासरालाही थोडं थांबायचं कळायला हवं असं म्हणून ती पुन्हा चरायला सुरुवात करते . हळूहळू आकाशात दोन घारी अगदी मुक्तपणे मोठ्या वर्तुळात मोठे पंख उघडून फिरत असतात आणि वर्तुळाचा परीघ अजून मोठा होत असतो .
सगळं कसं शांत सुंदर आणि पद्धतशीरपणे चालू असतं. मग लक्षात येतं की पुस्तक वाचायचं राहिलंय. गाई गुरं शेळ्या घराकडे चालू लागतात . सोनेरी संधीप्रकाशात निसर्ग अजूनच देखणा झालेला असतो अर्ध्या वाचलेल्या पुस्तकासारखा ......

Comments

  1. ब्लाॅग वाचताना खरंतर डाॅ. प्रकाश बाबा आमटे यांची आठवण झाली. कारण मला दोघांचेही प्राणीप्रेम दिसले.��

    ReplyDelete
  2. Nisarg varnan Ani pustak vachan yancha surekh Mel ghatala ahe keep it up

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

प्रासंगिक 6 : अखंड हरिनाम सप्ताहावर दीर्घ लेख

एका गावात साधारणपणे अखंड हरिनाम सप्ताह साधारणपणे प्रतिवर्षी एक पासून सात ते आठ एवढे असतात . गावातील संबंधित ट्रस्टची आर्थिक ताकद , प्रथा , परंपरा ,राजकीय गणिते , धर्म , विशिष्ट धर्मातील लोकांची संख्या , जात , हेवेदावे अशा सर्वच गोष्टींचा सप्ताह यशस्वितेवर आणि गर्दीवर परिणाम होतो . हे सर्व घटक सप्ताह नियोजनावर परिणाम करतात . गावाकडे सामान्यपणे सप्ताहाला 'सप्ता' असंच म्हणतात . ज्या देवाचा सप्ता असेल त्याच देवाच्या मंदिरात भाविकांची गर्दी असते  . सप्ताहाची चाहूल लागते ती माईक आणि साउंड सिस्टिमच्या टेस्टिंगसाठी दिलेल्या आवाजावरून . हॅलो चेक....माईक चेक ...हा$$$री.....हा$$$री  ....असे आवाज आले की समजायचं सप्ताह आज आहे . सप्ताहाच्या निमित्ताने टाळकरी , माळकरी , भजनी , साउंड सिस्टिमवाले , भटजी , महाराज , स्वयंपाकी , आचारी , पेटीवाले, संबळवाले , लाईट डेकोरेशन वाले , अगदीच मोठा सप्ता असेल तर कॅमेरावाले , अजूनच मोठा असेल तर पत्रकार , सगळे येतात . एकंदरीत सप्ता म्हणजे सात दिवस नो टेन्शन ! सप्ताहामध्ये विविध विषयांवर विविधांगी चर्चा व्हावी , विवेचन मांडले जावे , आयुष्याची आणि एक...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 5 : दिवळी आणि कोनाडा

मराठी भाषेतले गावरान आणि सुंदर शब्द हरवत चालल्याची जाणीव झाली आणि यातूनच गावपण हे सदर सुरू केले  . या सदरात आपण बघणार आहोत दिवळी आणि कोनाडा . आजच्या फ्लॅट संस्कृतीत जुन्या घरामध्ये आढळणाऱ्या अनेक गोष्टी दिसत नाहीत . कमी जागेत खूप काही देण्याच्या प्रयत्नात वास्तू विशारदाची देखील धांदल उडते . माझ्या मते आता शहरात स्थायिक झालेल्या पोरांना कोनाडा आणि दिवळी कधीच बघायला मिळणार नाही . असो आपण हे शब्द समजून घेऊ .... दिवळी हा स्त्रीलिंगी शब्द तर कोनाडा हा पुल्लिंगी . दिवळी ही सपराच्या (सप्पर - छोटी झोपडी ) भिंतीत हमखास असायची . दिवा ठेवण्यासाठी असलेली जागा म्हणजे दिवळी अशी व्याख्या आपण करू शकतो . दिवळी ही त्रिकोणी असते . देवळाच्या शिखरासारखी ती वरती  निमुळती होत जाते यावरून देखील त्याला दिवळी म्हणण्याचा प्रघात पडला असावा . सपराच्या दगडी भिंतीत दिवळी सुंदर दिसते . ती भिंतीत जास्तीत जास्त अर्धा फूट असू शकते . गावाकडे अजून दोन चार शब्द आढळतात .साधारण स्वयंपाकघरातून बैठकीच्या खोलीत बघण्यासाठी एक ते दोन इंच लांबी रुंदीचे एक आरपार भोक असायचे .त्याला 'झुरके' असा शब्द आहे . तर दूध आणि इ...