गोडवा भारतीय सणांचा :वटपौर्णिमा
भारतीय संस्कृती आपल्याला निसर्गमय करून टाकते .निसर्गाकडे नव्या नजरेने बघायला शिकवते . याच अनुषंगाने भारतीय सण उत्सव साजरे होतात . अगदी प्रत्येक सणाचा संबंध ऋतुमानानुसार आपल्या आरोग्याशी देखील जोडलेला आढळून येतो . असाच प्रत्येक स्त्रीच्या भावविश्वातला महत्वाचा सण म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते . वडाच्या झाडाची पूजा यानिमित्ताने महिला मंडळी बांधतात . या सणाच्या निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात ,हितगुज करतात आणि यातून नवे ऋणानुबंध वृद्धिंगत होतात . भारतीय संस्कृतीचा केवढा हा गोडवा !
जिथे श्रद्धेचा अतिरेक होतो तिथे अंधश्रद्धेचा उगम झालाच म्हणून समजा . मूळ उद्देशापासून जेव्हा आपण दूर जातो तेव्हा मात्र अंधश्रद्धेकडे झुकण्याचा धोका जास्त असतो . वटपौर्णिमा देखील अनेक अंधश्रद्धांच्या विळख्यात सापडली आहे . या चुकीच्या समजुती दूर सारून जर मूळ उद्देश समजावून घेतला तर हे सण आपल्या आयुष्यातील सुंदर काळ असतील . या सणांच्या निमित्ताने महिला गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली जमतात . तिथे हळद कुंकू वाहून मनोभावे नमस्कार करतात आणि हातातला दोरा गुंडाळून वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात . आंबे वाहतात . खेड्यात वडाच्या झाडाला वाहिलेले आंबे खाण्यासाठी बाल सवंगड्यांची मोठी फौज जमलेली असते . पावसाळ्याचे दिवस ,सरीवर सर कोसळणारे आल्हाददायक वातावरण आणि कमालीचा गारवा अशा स्वर्गीय वातावरणात ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला वटपौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो .
वडाचे झाड सदाहरित असून प्रचंड मोठे होत जाते . त्याचा विस्तार वाढत जातो करण त्याच्या पारंब्या जमिनीला टेकतात, तिथेच रुजतात आणि त्याचे मोठे खोड तयार होते . क्रमाक्रमाने झाडाचा विस्तार वाढत जातो . रस्त्याच्या दुतर्फा असलेली वडाची झाडे ही गावाची शान असते . या झाडाच्या प्रत्येक अवयवाचा उपयोग आयुर्वेदात सांगितला आहे म्हणूनच दीर्घायुष्य प्रदान करणारा असा हा वृक्ष आहे . आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे यासाठी वडाच्याच झाडाची पूजा का करावी या प्रश्नाचे भावनिक उत्तर इथे मिळते .
वडाच्या पानांचा काढा लघवीवरील विकारांमध्ये उपयुक्त असतो . वडाच्या सालीचा काढा स्त्रियांना मासिक पाळीच्या त्रासापासून मुकतो देऊ शकतो .वडाच्या पारंब्यांपासून पानातल्या चिकापर्यंत प्रत्येक घटक औषधी आहे . पारंब्याचे तेल वापरले तर त्या पारंब्यांसारखे केस वाढतात असं थोर मोठे सांगतात . वडाच्या झाडाभोवतालचे वातावरण प्रसन्न असते . जीवन जगण्यासाठी लागणारी पॉझिटिव्ह ऊर्जा मिळते . कदाचित याच कारणाने वटवृक्षाच्या पूजेची प्रथा पडली असावी .
संध्याकाळी महिला सत्यवान सावित्रीची पूजा करत पुढील प्रार्थना म्हणतात .
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
संध्याकाळी महिला सत्यवान सावित्रीची पूजा करत पुढील प्रार्थना म्हणतात .
सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||
विस्तारत जाणाऱ्या वडाच्या झाडाप्रमाने वंश वाढावा .पती मुले आणि एकूणच कुटुंबाला आयु आणि आरोग्य लाभावे . कुटुंबाची भरभराट व्हावी आणि सगळी सुखे मिळावीत अशी प्रार्थना भगिनी करते . एकूणच आपल्या पतीशी प्रामाणिक राहून पुढील मार्गक्रमण करण्याची अत्यंत सुंदर गोष्ट ती व्यक्त करते . या सणाच्या निमित्ताने नात्यातला विश्वास वृद्धिंगत व्हावा आणि यातूनच कुटुंबव्यवस्थेचा पाया उभा राहतो . भारतीय समाजव्यवस्थेचा कणा असलेली ही व्यवस्था एकमेकांना पूरक आहे . आजच्या स्वैराचार पसरलेल्या जमान्यात एकमेकांना विश्वासाने समजावून घेत प्रपंचगाडा हाकण्यासाठी ते सज्ज होतात . आजच्या तरुण तरूणींसाठी ही खरच मार्गदर्शक गोष्ट आहे .
आजकाल घरात एखादे वडाचे चित्र आणून त्याची पूजा केली जाते . वडाच्या फांदीची पूजा केली जाते पण यातून काहीही साध्य होत नाही . असे करून आपण वडाच्या झाडाला इजा पोचवत आहोत हे लक्षात ठेवा . वडाची आणि एकूणच सर्व वृक्षांची वृद्धी व्हावी ,हे पर्यावरण पुन्हा बहरावे अशा व्यापक दृष्टिकोनातून वटपौर्णिमा साजरी व्हायला हवी .घरात बसून निसर्ग तुम्हाला काय कळणार ? त्यासाठी निसर्गात निसर्गाचे बनून जावे लागते . निसर्गातल्या प्रत्येक हालचालीवर चिकित्सक मनाने नजर ठेवावी लागते आणि यातूनच आजूबाजूच्या पर्यावरणावर प्रेम जडते . अगदी उत्क्रांतीच्या काळात महिलांनी शेतीची संकल्पना मांडली असावी असा तर्क लावला जातो . त्यांचे हे विशेष निसर्गप्रेम लक्षात घेऊन या सणाची अशी रचना केली असावी .
स्वतःच्या आयुष्यासाठी आणि एकूणच दीर्घ आयुष्याची मागणी करताना एकूणच संपूर्ण पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेऊ . एका वेगळ्या आधुनिक दृष्टिकोनातून सण आणि उत्सवांकडून बघूया .
अजिंक्य दंडवते ,देवदैठण ,तालुका श्रीगोंदा ,जिल्हा अहमदनगर

Comments
Post a Comment