Skip to main content

Posts

प्रासंगिक 9 : का गॉड बोलायचं ? जे हाये ते बोलुदे ना !

तिच्यायला , आज सकाळपासून निस्ती गॉड बोलायची भाषा करत्येत सगळे . नाय तव्हा समोर आले तरी बोलत न्हाईत . सकाळपासून कणभर तीळ आन मणभर गुळानी लै चिक्कट चिकट वाटाय लागलंय . म्हणे तिळगुळ घ्या अन गॉड बोला . च्यायला काय रीश्वत देतो का धमकी ? अवघड हे भो . काही म्हणे हॅप्पी संक्रांती . आता तू म्हणल्यानी हॅप्पी होणार आसन तर कसं व्हायचं ? काहींनी माझ्या मनात कडूपणा हाय आसं धरून मला त्यो बाहेर टाकायला सांगितलं . बघू राव . च्यायला .काहींनी पतंग बी पाठवले . माझी किती पाखरं मरतीन आज . काही लाज हाये का तुम्हाला . औंदा आमच्या बा नी राखण नाय केली जवारीची . च्यायला सक्काळ सक्काळ २ हजार पाखरू येतं रानात . लै गॉड दिसतं ते . आमच्या एळेला एखाद्याच्या बड्डेला 'ह्याप्पी बड्डे' म्हणाय बी लाज वाटायची .म्होरं ती कमी झाली . 'थ्यांकू' म्हणाय आम्ही लै लेट शिकलो . तसं बगायचं झालं तर आमचे गुर्जी आम्हाला शिकवायचे पण आमी कधी म्हनलो नाय कुणाला . दिवाळीच्या , वाढदिवसाच्या सुभेच्छा द्यावा लागत्यात हे बी लै लेट कळलं . आमच्या इकडं साळत एखांद्याचा बड्डे असला की बाई त्याला उभा करायची . मंग आम्ही मोठ्या आवाजात...

प्रासंगिक 8 : नगर ते देवदैठण व्हाया स्टेट बँक शिरूर....

वेळ दुपारी एकची. निघालो पायीपायी थेट नगर कॉलेजवरून शक्कर  चौकापर्यंत . कोणालाही लिफ्ट मागून , रिक्षा करून मी माझा आत्मिक पराभव करून घेतला नाही . अर्थातच नशीब चांगले म्हणून एक 709 टेम्पो थांबला आणि माझा शिरूरकडे प्रवास सुरु झाला .709 विषयी माझी एक विशेष आठवण आहे त्यावर नंतर बोलू . निवांत झोप लागली . थेट शिरूरच्या विघ्नहर्ता हॉस्पिटलला उतरलो . तिथून एक मित्राने मला जोशीवाडीच्या स्टेट बँकेत सोडले आणि इथून माझे नशीब पलटले . अहो पालटले कशाचे चांगले कोलमडले , धडपडले . चांगलं खरचटलं असणार त्याला .! बँकेत प्रविष्ट झालो .गेल्यागेल्या 6 नंबरच्या कर्मचारी महाशयाला विचारले , "आधार लिंकचा पुरावा हवा आहे." त्याने फॉर्म घेतला . नंबर टाकून पहिला आणि महाशय वदले की "आधार लिंक केलेले नाही.तुम्ही लिंक करून घ्या " मी लगेच आधार आणि पण कार्डच्या झेरॉक्स जोडून दणदणीत सह्या ठोकल्या . तोपर्यंत गोंडस दिसणाऱ्या त्या गृहस्थापूढे दोन चार कागद येऊन पडले . मी त्याच्या पुढच्या डेक्सवर फॉर्म घेऊन उभा राहिलो . नंतर बसलो . सुमारे 20 मिनिटांच्या अवधीनंतर त्या महाशयांनी मला सांगितले की " आधार ...

गावपण भाग 11 : शिंकाळे

शिंकाळे आधुनिकता स्वीकारत आपण पुढे जात आहोत . आपल्यासोबत आपल्या सभोवतालच्या अनेक गोष्टी बदलत आहेत . अगदी सजीव आणि निर्जीव सुद्धा . या काळाच्या कचाट्यात निर्जीव गोष्टी देखील बदलल्या . अनेक गोष्टी गायब झाल्या , हरवल्या . त्यांच्यासाठी काळ एक प्रलय ठरला . विनाशकारी प्रलय ! कालौघात आलेल्या आधुनिक वस्तूंनी जुन्या वस्तूंना नामोहरम केले . पुराणात जरासंध नावाच्या राक्षसाची कथा येते . फाडून फेकला तरी तो पुन्हा उभा राहायचा .फ्रिजच्या आक्रमणाने शिंकाळं नामशेष झालं , वापरात राहिलं नाही पण शोभेची वस्तू म्हणून टिकून आहे . मुख्य म्हणजे दूध मांजरापासून , उंदरापासून , मुंग्यांपासून सुरक्षित राहावं यासाठी एका चौकोनी पेटीत टांगून ठेवले जाते . त्याला शिंकाळे म्हणतात . ग्रामीण भाषेत 'शिंकं' असंही म्हटलं जातं . अनुस्वार म्हणण्याची अडचण असल्याने 'शिकं' असं म्हटलं जातं . ते साधारण हाताने सहज काढता येईल अशा उंचीवर टांगलेले असते . शिंकाळं बांबूपासून , विविध वेलांपासून देखील बनवले जाते . त्याला व्यवस्थित झाकण देखील असते . पण गावाकडे आम्ही  चक्क महावितरणच्या तारेचं शिंकाळं केलं ! धाग्य...

गावपण भाग 10 : पाणंद

हा शब्द गुगल केला तर शे ता मधली वाट असा अर्थ मिळतो . या शब्दाचा अपभ्रंश होऊन ,  ग्रामीण लहेजा घेऊन हा शब्द पाणद, पाणंद, पाणंध, पाणंदी, पाणंधी अशा विविध रुपात नाचत आहे . शेतातून जाणारी वाट  म्हणजे "पाणंद " .   दुतर्फा झुडपांचं कुंपण असलेल्या अरुंदशा कुठल्याही वाटेला सर्रास पाणंद म्हटलं जातं .हि पाणंद अनेकांच्या आठवणींमध्ये जिवंत आहे . हा शब्द मात्र अस्तंगत होतोय . असो . हा शेताचा बांध असल्यामुळे पानंदीच्या दुतर्फा घायपात लावले जाते . त्याच्या टोकदार काट्यांमुळे कुंपण मिळते आणि मालाचे संरक्षण होते . पाणंद ही खूप जिव्हाळ्याची गोष्ट आहे . आजूबाजूला झाडाझुडपांचा गराडा , मोठ्या वृक्षांची सावली , मधेच आडवे येणारे छोटे ओढे , असंख्य पक्षी , साप , खारुताई , उंदीर , सरडे सर्वांचे एकत्रित अस्तित्व असणारी पाणंद सुंदर असते . मला हिवाळ्यात पाणंद विशेष आवडते कारण हिरव्यागार झाडीतून धुक्याच्या दुलईतून चालताना खोड्या कराव्यात तशी ती झाडे आपल्यावर दवबिंदू शिंपडत असतात . चुकूनजरी एखाद्या झाडाला धक्का लागला तरी सगळं पाणी अंगावर पडणार आणि थंडी वाजणार !खाली गवत देखील...

गावपण भाग ९ : विझारा

अजूनही गावाकडे अनेक जुने आणि सुंदर शब्द वापरात आहेत पण मला भीती आहे कि हे शब्द कालांतराने राहणार नाहीत.  त्यापैकी जेवढे जमतील तेवढे शब्द मी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय . इंग्रजी भाषेच्या आक्रमणाने आणि शुद्ध मराठी भाषेभोवती निर्माण झालेल्या प्रोपागंडाने ग्रामीण बोलीभाषा धोक्यात आल्या आहेत . खरं तर भाषेच्या शुद्ध रुपाइतकीच गोडी बोलीभाषांना असते . पण आता बोली भाषेत बोलण्याचा आग्रह देखील आपण धरू शकत नाही .  असो , आज आपण 'विझारा' हा शब्द शिकणार आहोत .  विझारा या शब्दाची संधी केली तर वीज + झरा = झरा अशी होईल . वीज पडल्यामुळे निर्माण झालेला झरा म्हणजे विझारा . पावसाळ्यात वीज पडण्याच्या घटना घडतात , यामध्ये बऱ्याच वेळा जीवितहानी होते . त्यामुळे वीज पडण्याची भीती सर्वांनाच असते . जिथे पाणी असते तिथे वीज पडते असे म्हणतात . किंवा वीज जिथे पडेल तिथे पाणी काढते . अशीच आमच्या डोंगरावर वीज पडली आणि तिथून अव्याहत झरा वाहणे सुरु झाले . तोच हा विझारा  .  छायाचित्र : विझारा  गावाकडच्या लोकांना शब्दांची चिरफाड करण्याची फार सवय असते . साधे साधे शब्द दे...

प्रासंगिक भाग 8 : गावाकडची चूल टिकेल का ?

गावाकडे जाऊन आलो की मन तिकडे अडकून बसतं . तिकडच्या जगण्यातला साधेपणा खूप जास्त सुंदर आहे . इकडे शहरात भरून राहिलेला यांत्रिकपणा , नात्यागोत्यांचा गुंता , आधुनिकतेच्या नावा खाली सुरू असलेले ढोंग आणि आपल्या आयुष्याची सुरू असलेली मार्केटिंग मला असह्य होते . माझे प्रश्न साधे असतात . संध्याकाळी अंथरुणावर पाठ टेकली की प्रश्नांचं मोहळ उठतं . आईनंतर मला चुलीवरची भाकरी पुन्हा मिळेल का ? गावाकडची ती चूल टिकेल का ? गोठ्यात वासरू ओरडेल का ? घरासमोर पक्षी येतील का ? रांगडा बाज असलेली भोळी भाबडी जुनी माणसं पुन्हा तो रुपायएव्हढा बुक्का लावून काठी टेकवत येतील का ? हे प्रश्न हल्ली मला जगू देत नाहीत . बदलाच्या या कचाट्यात माझ्या मेंदूचे तुकडे व्हायला लागलेत . आयुष्यात काय साध्य करण्यासाठी हा सगळा अट्टाहास सुरू आहे ? हे सगळे थांबवले नाही तर याच्या शेवटाला थोड्याफार भावना उरतील का ? आयुष्य कोरडे होत चालले आहे ? समाज कोरडा पडत चाललाय . हे थांबेल का ? गाय वासराला चाटेल का ? पेटलेली चूल ऊब देईल का ? भाकरीचा पातोडा निघेल का ? भाकरीचा पातोडा निघण्यासाठी माणसाच्या मनं मोकळी असावी लागतात . दूध काढून झाल्...

गावपण भाग 8 : वाढं , मोळी आणि भेळा

जुने शब्द माहीत करून घेण्याचा सिलसिला असाच सुरू राहील.जुन्या संस्कृती वर माझे प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे . या लेखांच्या माध्यमातून मलाही जुन्या आठवणी पुन्हा जगायला मिळतात . ज्यांनी ऊसतोड पहिली आहे त्यांच्यासाठी हे शब्द नवे नाहीत . साखर कारखान्यांमध्ये होणारे घोटाळे , शेतकऱ्यांची लूटमार , काटामारीची बिमारी ,  दिवस दिवस ताटकळत बसलेले शेतकरी  , ऊसतोडणी कामगारांच्या आरोग्याचा , शिक्षणाचा , जीविताचा प्रश्न हे सगळे विषय बाजूला ठेऊन इथे फक्त त्या शब्दांना न्याय देऊ ... ज्याची वाढ होते ते वाढे . वाढे हा ऊसाचा वाढणारा शेंडा असतो . जिथे ऊसाच्या कांड्या संपतात आणि कोवळा हिरवा भाग सुरू होतो तिथून ऊस आणि वाढे वेगळे केले जाते . कोयत्याने तोडणारा ऊस आणि वाढे वेगळे करतो . आता हे वाढे जनावरांना खाण्यासाठी नेले जाते . या वाढयावरची मालकी ऊस तोडणी कामगारांची असते . त्यामुळे वाढयातून मिळणारे पैसे हा त्यांचा बोनसच असतो . अशा वाढयांना एकत्र करून त्यांची पेंडी बांधली जाते . त्याला भेळा म्हणतात . पूर्वी एका भेळ्यात दहाच्या आसपास वाढे असायचे  . त्याची किंमत साधारण 100 ते 200 रुपये शेकड्य...